पुणे- पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था या चार नामवंत शिक्षण संस्थांची आज महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर ऑनलाइन बैठक पार पडली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांना भेडसावणारे ज्वलंत प्रश्न सामंत यांच्यासमोर मांडण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी होऊ घातलेल्या प्रचंड वाढीव खर्चाविषयी सामंत यांना अवगत केले.
शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन यांनी शिक्षण संस्थांची सरकारकडे थकीत असलेली शिष्यवृत्तीची रक्कम लवकरात लवकर मिळावी अशी भूमिका मांडली. त्याच प्रमाणे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षण संस्थांना सरकारने आधार द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी अभ्यासक्रमांची प्रलंबित असलेली परवानगी तसेच अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रलंबित असलेली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करावी अशी भूमिका मांडली.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजन गोऱ्हे यांनी किमान या वर्षी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया न राबवता संस्थांना थेट प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी सरकारने द्यावी, विज बिल आणि मिळकत करात संपूर्ण सूट द्यावी तसेच जीएसटी दरामध्ये कपात करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आवर्जून वेळ काढून या चर्चेला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. वर उल्लेख केलेल्या सर्व मुद्द्यांची त्यांनी काळजीपूर्वक नोंद घेतली आणि आठवडाभरात पुन्हा एकदा अशाच ऑनलाईन बैठकीचे आश्वासन दिले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीराम नेर्लेकर यांनी माननीय मंत्र्यांचे स्वागत केले आणि संस्थेचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.