औरंगाबाद- मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादेत होणारी सभा रद्द करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका खंडपीठाने याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंड लावून फेटाळली. राजकीय हेतूने प्रेरित याचिका दाखल केल्याचे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने तीन दिवसात दंडाची रक्कम जमा करण्यास बजावले. रिपब्लिकन युवा मोर्चाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख जयकिसन उदकराम कांबळे यांच्यावतीने वकिल अजय कानवडे यांनी कालच २९ एप्रिल रोजी याचिका दाखल केली होती ,जी आज दंड लाऊन फेटाळण्यात आली .
राज ठाकरेंच्या सभेला विरोध करणाऱ्या याचिकेवर नेमकी काय झाली सुनावणी..
– अॅड. कानवडे : राज यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे समाजात तेढ, दंगल होऊ शकते. त्यामुळे सभेवर बंदी आणावी. ते शक्य नसल्यास भाषणाची लिखित प्रत पोलिस आयुक्त, खंडपीठाला देण्यात यावी, सभेचे थेट प्रक्षेपण करू नये.
– सरकारी वकील अतुल काळे : मिलाॅर्ड, बॉम्बे पोलिस अॅक्टप्रमाणे सभेला परवानगी असल्याने याचिका दिवाणी पीठासमोर चालवण्यात येऊ नये.
न्यायमूर्ती धानुका, मेहरे : ठीक. फौजदारी पीठासमोर याचिका दाखल करा.
(4 वाजता न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्यासमोर याचिका दाखल झाली.)
न्यायमूर्ती जाधव : याचिकेसोबत पोलिस आयुक्तांचे सभेच्या परवानगीचे आदेश याचिकेसोबत नाहीत. त्यामुळे हे प्रकरण दिवाणी पीठासमोर चालविले जावे.
(याचिकाकर्ते सायंकाळी ५.३० वाजता पुन्हा न्यायमूर्ती धानुका, मेहरे यांच्या पीठासमोर हजर झाले.)
अॅड. कानवडे : मिलाॅर्ड, शनिवार, रविवारी सुटी आहे आणि रविवारीच सभा आहे. त्यामुळे तातडीची बाब म्हणून याचिका प्राधान्याने ऐकून घ्यावी.
अॅड. अतुल काळे : मिलाॅर्ड, पोलिस आयुक्तांनी सभेला दिलेल्या परवानगीपत्राची प्रत सादर केली आहे.
न्यायमूर्ती धानुका, मेहरे : दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे भाषण केले जाऊ नये यासंंबंधीचा उल्लेख परवानगीपत्रात आहे ना? त्यावर काय म्हणणे आहे?
अॅड. कानवडे : तसे असले तरी याचिका दाखल करून घ्यावी. त्यातील विनंतीनुसार आदेश पारित करावेत.
न्यायमूर्ती धानुका, मेहरे : किती अनामत रक्कम जमा करू शकता? पाच लाख रुपये अनामत जमा करू शकता काय?
अॅड. कानवडे कांबळे यांना उद्देशून : पाच लाख रुपये जमा करू शकता?
कांबळे : नाही, 1 लाख जमा करू शकतो.
न्यायमूर्ती धानुका, मेहरे : ठीक आहे. ही याचिका फेटाळण्यात येत असून याचिकाकर्त्याने एक लाख रुपये दंड तीन दिवसांत जमा करावा.