पुणे : “सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने विविध कंपन्यात कार्यरत नोकरदार, ‘सूर्यदत्त’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, पोलीस, पत्रकार, निवृत्त सैनिक व कोरोनामध्ये मृत पावलेल्या कुटुंबातील व्यक्ती, पुण्यातील स्वयंसेवी संस्थात राहणारे व अनाथ विद्यार्थी यांना पदवी व पदव्युत्तर पदवी आणि पदविका अशा उच्च शिक्षणासाठी लाइफलॉंग लर्निंग उपक्रमांतर्गत ७५ लाखाची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे,” अशी माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. प्रशांत पितालिया उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “स्वातंत्र्याची ७५ वर्षे अर्थात आझादी का अमृतमहोत्सव या निमित्ताने सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट & सीएसआर इनिशिएटिव्ह द्वारे ‘सर्वांसाठी शिक्षण’ अंतर्गत ही ७५ लाखांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य विद्यापीठांशी संलग्नित अर्धवेळ किंवा डिस्टन्स लर्निंग किंवा अल्प कालमर्यादेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम शनिवार-रविवार शिकता येतील अशा अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. दहावी, बारावी व पदवीनंतरचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.”
“नोकरी करत अर्धवेळ शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात येत आहे. यंदा शिष्यवृत्ती योजनेचे अकरावे वर्ष असून, गेल्या १० वर्षात १३०० पेक्षा अधिक नोकरदार विद्यार्थ्यांनी साडेतीन कोटी रुपयाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. २०० पेक्षा अधिक कंपन्यांना आपल्या संस्थेतील चांगल्या कर्मचाऱ्यांची शिफारस करण्याची विनंती करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवार पदवीधारक, तसेच २२ ते ५० या वयोगटातील असणे आवश्यक आहे,” असे प्रा. डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.
“यासह यंदा सूर्यदत्त संस्थेत शिकणाऱ्या पालकांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार असून, या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांना, तसेच निवृत्त झालेल्या व्यक्तींना बराचसा वेळ शिल्लक असतो. त्यांना काही अभ्यासक्रम शिकता येतील. तसेच त्यांना आपल्या वेळेचा सदुपयोग करता येईल. पोलीस व पत्रकारांसाठीही काही अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले असून, त्यांना स्वतःला अद्ययावत करण्यासाठी शिक्षण घेता येणार आहे. त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. गृहिणींना घर सांभाळून शिकता येणारे अनेक अभ्यासक्रम विविध विद्यापीठांच्या मार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कोरोना काळात ज्यांचे पती किंवा पत्नी मृत पावली असेल, अशा व्यक्तींना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांना पुढील शिक्षण घेऊन पुन्हा करिअर करता यावे, यासाठी शिष्यवृती उपलब्ध करून दिली जाणार आहे,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले.
“सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट दर्जेदार, संशोधनात्मक शिक्षण, सर्वांगीण विकास आणि तज्ज्ञ व्यवस्थापन असलेली शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. सोबतच सामाजिक जागरूकता जपत विविध उपक्रम संस्थेत राबवले जातात. विविध कंपन्यांकडून इच्छूक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यातून योग्य उमेदवारांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, फॉरेन ट्रेड आदी शाखांमध्ये पीजीडीएमएलएम, पीजीडीएफटी, पीजीडीएमएम, पीजीडीएफएस आदी अभ्यासक्रम शिकता येतील. प्रोडक्शन मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, लाईन लीडर, सिनिअर इंजिनिअर, हार्डवेअर-सॉफ्टवेअर इंजिनिअर, टीम मेम्बर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, डायरेक्टर, पर्चेस ऑफिसर, स्टोअर असिस्टंट, सुपरिंटेंडेंट्स आदी पदांवर काम करणारे यासाठी पात्र असतील.
या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२२ आहे. कंपन्यांच्या सीईओ/एचआर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची नावे १० जुलैपर्यंत पाठवावीत. तज्ज्ञ समितीकडून आलेल्या अर्जाची छाननी करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्यांची अंतिम यादी १० ऑगस्ट २०२२ नंतर जाहीर होतील. अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा इच्छुकांनी आवडीच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक कागदपत्रांसह ८९५६९३२४१५/ ८९५६९३२४१७/ ८९५६९४३८२०/ ८९५६९३२४५६/ ९७६३२६६८२९/ ८९५६९३२४०० यावर संपर्क साधावा.