नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2020: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर यांची अखिल भारतीय टेनिस संघटने(एआयटीए)च्या सहसचिवपदी निवड करण्यात आली असून तर, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा यांची अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)च्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकी नंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
खासदार डॉ अनिल जैन यांची अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)च्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. रविवारी येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या सर्व पदांच्या निवडणूका यशस्वीपणे पार पडल्या. बिनविरोध पार पडलेल्या या निवडणुकीत डेव्हीस करंडक स्पर्धेचे कर्णधार रोहित राजपाल यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली, तर अनिल धुपार यांची महासचिवपदी फेरनिवड करण्यात आली.
भरत ओझा यांच्याबरोबरच आणखी आठ उपाध्यक्षांची निवड करण्यात आली असून यामध्ये माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांचा समावेश आहे. तसेच, मावळते महासचिव हिरन्मय चॅटर्जी आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू विजय अमृतराज यांचाही आठ उपाध्यक्षकांमध्ये समावेश आहे. एकूण 4 सहसचिवांमध्ये प्रेमकुमार कारा, रक्तीम सेकिया व सुमन कपूर यांचाही समावेश आहे. तसेच, या कार्यकारिणीत आणखी 7 सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
सुंदर अय्यर यांनी गेल्या 30 वर्षांपासून पुणे आणि महाराष्ट्रातील टेनिसच्या विकासामध्ये बहुमोल योगदान दिले असून विविध स्तरावरील स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करून त्यांनी राज्यातील टेनिसच्या विकासाला मोठाच हातभार लावला. सुंदर अय्यर यांनी भरत ओझा, शरद कन्नमवार व एमएसएलटीए समिती यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील छोटी शहरे व गावांमध्येही टेनिसच्या सुविधा व प्रशिक्षणाच्या सोयी पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तसेच, ग्रामीण परिसरातील गुणवान युवकांना प्रशिक्षकांच्या भूमिकेत आणण्यात सुंदर अय्यर यांनी महत्वाची भूमिका बजावली. व्हिजन प्रोग्राम आणि टेनिस लायब्ररी हे दोन अत्यंत उपयुक्त उपक्रम अय्यर यांनी राबविले. पुण्यात 45 वर्षानंतर डेव्हीस करंडक लढत आयोजित करण्यात अय्यर यांचा मोलाचा वाटा होता.
राष्ट्रीय स्तरावर टेनिसच्या विकासाला हातभार लावण्यात आणि संघटनेसाठी कार्य करण्यात मला मोठाच बहुमान वाटतो, असे सांगून सुंदर अय्यर म्हणाले की, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, माजी अध्यक्ष शरद कन्नमवार, एआयटीएचे माजी अध्यक्ष अनिल खन्ना माजी महासचिव हिरन्मय चॅटर्जी आणि विद्यमान महासचिव अनिल धुपार यांनी या प्रतिष्ठेच्या पदासाठी माझी निवड करताना माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि राष्ट्रीय स्तरावर सेवेची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. एआयटीएच्या सहसचिवपदी निवडून आलेले सुंदर अय्यर हे पुण्यातील डॉ.जीए रानडे यांच्यानंतर दुसरे आणि महाराष्ट्रातील चौथे व्यक्ती आहेत.
एआयटीए संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे
अध्यक्ष- डॉ अनिल जैन;
उपाध्यक्ष-हिरन्मय चॅटर्जी, चिंतन पारीख, नवनीत सेहगल, अनिल खन्ना, भरत ओझा, सीएस सुंदर राजू, विजय अमृतराज, राजन कश्यप;
महासचिव- अनिल धुपार;
खजिनदार- रोहित राजपाल;
सहसचिव- प्रेमकुमार कारा, रक्तीम सेकिया, सुमन कपूर, सुंदर अय्यर;
कार्यकारिणी समिती- डॉ.अखोरी प्रसाद, अनिल महाजन, अंकुश दत्ता, अशोक कुमार, गुरुचरण सिंग होरा, कॅप्टन मूर्ती गुप्ता, थॉमस पॉल.