राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या मानस धामणे, मधुरीमा सावंत, रुमा गायकैवारी यांचा अंतिम प्रवेश
पाचगण-रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या मधुरीमा सावंत, रुमा गायकैवारी यांनी, तर मुलांच्या गटात मानस धामणे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीच्या सामन्यात बिगरमानांकीत महाराष्ट्राच्या मधुरीमा सावंत हिने बाराव्या मानांकित कर्नाटकाच्या चार्मी गोपिनाथवर 6-3, 6-1 असा सनसनाटी विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित रुमा गाईकैवारी हिने सातव्या मानांकित सोनल पाटीलचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत रुमा गाईकैवारीचा सामना मधुरीमा सावंत हिच्याशी होणार आहे.
मुलांच्या गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकीत मानस धामणेने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या प्रणव रेथिनचा 6-3, 6-3 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. कर्नाटकाच्या आठव्या मानांकित स्कंद राव याने महाराष्ट्राच्या अर्णव ओरूगंतीचा 6-4, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. अंतिम फेरीत स्कंद राव समोर अव्वल मानांकित मानस धामणेचे आव्हान असणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी- 14 वर्षाखालील मुले
मानस धामणे(1)(महाराष्ट्र) वि.वि.प्रणव रेथिन(3)(तमिळनाडू) 6-3, 6-3;
स्कंद राव(8)(कर्नाटक)वि.वि.अर्णव ओरूगंती(महाराष्ट्र) 6-4, 6-1;
14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
मधुरीमा सावंत (महाराष्ट्र) वि.वि.चार्मी गोपिनाथ(12)(कर्नाटक)6-3, 6-1;
रुमा गाईकैवारी(2) (महाराष्ट्र)वि.वि .सोनल पाटील(7)(महाराष्ट्र)6-3, 6-2.