एका बाजूला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा तर दुसरीकडे त्याचाच झाला भांडाफोड
आपत्ती व्यवस्थापनाचा कारभार दरेकरांनी आणला चव्हाट्यावर
मुंबई, दि. ९ जून – मुंबईच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पाच तास अडकलेल्या एसटीला काढण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून साधी क्रेनची व्यवस्था होऊ शकली नाही, महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा हा नमुना बघण्यासाठी मी स्वतः साक्षीदार आहे, अशी जळजळीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी महानगरपालिकेवर केली आहे.
परळ, हिंदमाता आणि गांधी मार्केट सर्कल या ठिकाणी साचलेल्या पाण्याची आणि महापालिकेच्या उपाययोजनांची पाहणी दरेकर यांनी आज केली, त्यांच्या समवेत भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर, आमदार तमिल सेलवन हेही उपस्थित होते.
पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, गांधी मार्केट येथे प्रवाशांनी भरलेली एक एसटी अडकून पडल्याचे आम्हाला लक्षात आले. यामुळे वाहतूक तब्बल ५ तास ठप्प झाली होती. एक ते दीड किलो मीटर कंमरेभर पाण्यातून मुंबईकरांना जावे लागत होते. या मुंबईकरांना आणि एसटी मधल्या प्रवाशांना साधे पिण्याचे पाणी किंवा खाण्याचे पदार्थ यांची व्यवस्थाही यंत्रणांकडून झाली नाही. भाजपाचे आमदार तमिल सेलवन यांनी ती व्यवस्था केली. अधिकारी, यंत्रणांना सूचना देऊन घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्याचा, एसटीला बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. पण सर्वात दुर्दैवी आणि संतापजनक बाब ही आहे की, एसटी काढण्यासाठी पाच तास क्रेनची व्यवस्था महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून होऊ शकली नाही. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा हा असा नमुना आज आम्ही अनुभवला. यावरून महानगरपालिका, सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मुंबईकरांसाठी किती ‘अलर्ट’ आहे, हे लक्षात येईल, अशी टीका दरेकर यांनी केली.