पुणे : ज्ञानसारस्वतीचे अधिष्ठान, तसेच गुरुचरित्रातील १४ व्या अध्यायाचे पवित्र स्थान असलेल्या तेलंगणा येथील बासर गावातील पुरातन दत्त मंदिराच्या जीर्णोद्धार व भक्तार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त दि. ५ ते ८ जून २०२२ दरम्यान तीन शंकराचार्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्रीगुरुमंदिर नागपूर प्रणित श्री नृसिंह सरस्वती आणि सायंदेव सेवा समिती बासर यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्नाटकातील हम्पी पीठाचे पूज्यपाद श्री जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्यारण्य भारतीस्वामी, कंपाली नारायण भारती पीठाचे पूज्यपाद श्री जगद्गुरू शंकराचार्य श्री नारायण विद्याभारतीस्वामी आणि करवीर पीठाचे मठाधिपती पूज्यपाद श्री जगद्गुरू शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी या तीन शंकराचार्यांसह परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी चार दिवस हा सोहळा रंगणार आहे. या काळात श्रीगुरुचरित्र अखंड शृंखला पारायण दि. ६ रोजी पहाटे ६ पासून ते दि. ८ रोजी पहाटे ६ पर्यंत श्रीदत्त मंदिरात होणार आहे.
रविवार (५ जून) दुपारी ३ वाजता सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. बासरी व व्हायोलिनच्या सुरेल मैफलीचा ‘सुरनाद संध्या’ हा कार्यक्रम होणार असून, यात प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक व प्रसिद्ध व्हायोलिन वादक श्रुती भावे यांचा कलाविष्कार पेश होणार आहे. सोमवारी (६ जून) पहाटे ६ पासूनच कार्यक्रम सुरु होतील. यात काकड आरती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा त्रिदिवसीय विधी प्रारंभ, उपासना आदी उपक्रम होतील. सकाळी १० वाजता नागपूरचे मोहनबुवा कुबेर यांचे कीर्तन पुष्प पहिले सादर होणार आहे. सायंकाळी ६ वाजता हंपी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हातून ‘कल्याण’ पादुकांची स्थापना व श्रींची नगर प्रदक्षिणा होईल.
मंगळवारी (७ जून) काकड आरती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा द्वितीय दिवस विधी, उपासना आदी उपक्रम होतील. सकाळी १० वाजता नागपूरचे मोहनबुवा कुबेर यांचे कीर्तन पुष्प दुसरे होईल. त्यानंतर १२ वाजता कंपाली पीठ व संकेश्वरपीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते गोपूजन व कामधेनू स्थापना होणार आहे. दुपारी ४ वाजता उपासनेचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘कलादर्शन’ होणार आहे. यानंतर सायंकाळी ७ वाजता सद्गुरुदास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा होणार आहे. यावेळी दोन्ही शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत.
शेवटच्या दिवशी बुधवारी (८ जून) नियमित विधी उपासनांबरोबर सकाळी ९ वाजता तेलगू नाटिका सादर होणार आहे. त्यानंतर भजन सेवा होईल. सकाळी पावणेअकरा वाजता मरडसगाव येथील गुरु गंगागिर महाराज मठ संस्थानचे संत दत्तगीर महाराज यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. भक्तार्पण सोहळा, संतपूजन, संत आशीर्वचन व सद्गुरुदास महाराज यांचे समारोपीय आशीर्वचन याने सोहळ्याचा समारोप होईल.
अधिकाधिक उपासकांनी या चार दिवसांच्या श्रीदत्त मंदिराच्या जीर्णोद्धार व भक्तार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे. येणाऱ्या दत्तभक्तांसाठी ४ दिवस राहण्या-जेवण्याची व्यवस्था निःशुल्क करण्यात आली आहे. तसेच पुण्यातून नाममात्र शुल्क घेऊन जाण्या-येण्याची व्यवस्था केली आहे. भक्त व उपासकांनी सहभागासाठी संपर्क ९८२३००६६७६, ८३८१००१९२६, ९८२२९६८६८९ या दूरध्वनींवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री नृसिंह सरस्वती आणि सायंदेव सेवा समिती बासर यांच्या वतीने करण्यात आले आहे.