मुंबई – जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांच्या चारचाकी वाहनास आज मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, अभिनेत्री शबाना आझमी यांचे चारचाकी वाहन (एमएच ०२ सीझेड ५३८५) व एका ट्र्क दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्याजवळ धडक झाली.
जखमी झालेल्या शबाना आझमी व वाहन चालकास तातडीने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यावेळी गाडीमध्ये जावेद अख्तर हे देखील होते मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
एक्स्प्रेस वेवर एका ट्रकला मागून शबाना आझमी यांची कार धडकली आणि हा अपघात घडला. कारमध्ये चालक, शबाना आझमी यांच्यासोबत जावेद अख्तरसुद्धा होते. कारचा चालकसुद्धा जखमी झाला आहे. तर जावेद अख्तर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातात आझमी यांच्या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शबाना आझमी यांच्या नाक आणि तोंडाला मार लागला आहे. दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
अधिक उपचारांसाठी शबाना यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
शबाना यांचे पती जावेद अख्तर यांचा ७५ वा वाढदिवस १७ जानेवारी म्हणजे कालच साजरा करण्यात आला. हा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. यानिमित्त १६ आणि १७ जानेवारी अशा दोन पार्टी आयोजित करण्यात आल्या होत्या. पहिली पार्टी रेट्रो थीमवर होती तर दुसरी पार्टी ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. या पार्टींत बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. या जंगी सेलिब्रेशननंतर दुसऱ्याच दिवशी अख्तर कुटुंबावर अपघाताचा आघात झाला आहे.