नागपूर-एखाद्या व्यक्तीने दुसऱयाला तुला कोर्टात बघून घेईन म्हणणे ही धमकी होत नाही. न्यायालयात जाण्याचा इशारा देणे हा कायद्याने गुन्हा नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी रजनीकांत बोरेले यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे.
7 मार्च 2009 रोजी बोरेले यांचा तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी यांच्याशी काही कारणास्तव वाद झाला होता. तेव्हा मी त्म्हाला कोर्टात बघून घेईन, तुमच्या चुकीच्या गोष्टी कोर्टापुढे मांडेन, असे बजावले होते. त्या पार्श्वभूमीवर भराडी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे धमकी दिल्याबाबतचा गुन्हा दाखल केला होता. तो रद्द करण्याची मागणी बोरेले यांनी केली होती.
सत्र न्यायालयाने ती मागणी फेटाळत खटला सुरू ठेवल्याने बोरेले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत सत्र न्यायालयात बोरेले यांच्याविरोधात सुरू असलेला खटला रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.