मुंबई-शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत तसेच त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे. ईडीने स्वःतच्या मर्जीने आरोपी निवडले आहेत. मुख्य आरोपींना ईडीने अटक केली नाही, अशी गंभीर टीप्पणी ‘पीएमएलए’ कोर्टाने केली आहे.राऊंताच्या जामीन अर्जावर आज झालेल्या सुनावणीवेळी ईडीला ही चपराक लगावली आहे. यावरून येणाऱ्या काळात नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘पीएमएलए’ कोर्टाने काय म्हटले?
- ईडीने गुणवत्तेच्या आधारावर युक्तीवाद करावा.
- आरोपींना अटक कायदेशीर होती हे पटवून द्या.
- संजय राऊत यांना कोणतेही कारण नसताना अटक.
- जामीन अर्जावर सुनावणीवेळी ईडीला कोर्टाने खडसावले.
- प्रमुख आरोपी राकेश वाधवान, सारंग वाधवान यांना अटक नाही.
- म्हाडाची भूमिका संशयास्पद पण म्हाडाच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई नाही.
- अन्य आरोपींवर कुठलाही कारवाई कारवाई झाली नाही.
- प्रवीण राऊत यांना दिवाणी प्रकरणात अटक.
हायकोर्टाचा स्थगितीस नकार
विशेषतः हायकोर्टानेही संजय राऊत यांच्या जामीनावर तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला. तसेच, या प्रकरणात प्रवीण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर या निर्णयाविरोधात इडीतर्फे मुंबई हायकोर्टात धाव घेतली. परंतु, हायकोर्टानेही संजय राऊत यांच्या जामीनावरील स्थगितीला नकार दिला. त्यामुळे उद्या या प्रकरणावर सुनावणी होईल. तुर्तास हा राऊतांना सर्वात मोठा दिलासा तर इडीला झटका मानला जात असून आज सायंकाळी सातपर्यंत राऊत जेलमधून बाहेर येणार आहेत.
कोर्टाचा शेरा विचार करण्यासारखा – अंधारे
सुषमा अंधारे म्हणाल्या, कोर्टाने जो शेरा दिला तो विचार करण्यासारखा आहे. ईडीवर कोर्टाने ज्या टीप्पणी केली आहे. ईडीने दाखल केलेल्या पाच हजार आठ केसेसमध्ये केवळ आठ केसेसचा निकाल लागला म्हणजेच लोकांना बदनाम करणे, कुटुंबांना नाहक त्रास देणे हा याचा अर्थ आहे.
कारागृह, घराबाहेर जल्लोष-आज दिवाळी
संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यभरात आनंदोत्सव साजरा होत आहे. आर्थर रोड कारागृहाच्या आवारात मोठी गर्दी सध्या जमली असून तेथे आनंदोत्सव साजरा केला जात आहे. जेलपासून संजय राऊत यांच्यासह दुचाकी फेरीही निघणार आहे. लढवय्या योद्धा अशा बिरुदावलीचे बॅनरही कार्यकर्त्यांच्या हाती आहेत.
याशिवाय संजय राऊत यांच्या घरीही दिवाळी साजरी होणार असून त्यांच्या घरासमोर रांगोळी काढण्यात आली असून स्वागतासाठी मोठा समुदाय तेथे उपस्थित आहे. राऊत आधी सिद्धीविनायक दर्शनासाठी नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर मातोश्रीवर जातील व शेवटी घरी जातील.