केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी हयातीचा डिजिटल दाखला उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी भारत सरकारच्या कार्मिक-सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान प्रणाली, कार्मिक-सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सुरु केली. निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखा समाधानात जाण्याच्या दृष्टीने, हयातीचा दाखला देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करून, डिजिटल हयातीचा दाखला /फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याचे निर्देश, सर्व नोंदणीकृत निवृत्तीवेतनधारक संघटना, पेन्शन वितरण बँका, भारत सरकारची मंत्रालये आणि सीजीएचएस केंद्रांना देण्यात आले होते. या संदर्भात, केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक पुण्यात आले आणि त्यांनी आज 13 नोव्हेंबर 2022 रोजी, भारतीय स्टेट बँक, पुणे मुख्य शाखा, डॉ. आंबेडकर रोड, जिल्हाधिकारी कार्यालय कंपाउंड, पुणे-411001 इथे, केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी मोहीम राबवली.
निवृत्तीवेतनधारकांनी या मोहिमेत उत्साहाने भाग घेतला आणि हे नवीन तंत्रज्ञान आणल्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले. आपल्या मोबाईल फोनमध्ये फेस ऑथेंटिकेशन हयातीचा दाखला अॅप कसे डाउनलोड करायचे आणि आपल्या फोनवरूनच हयातीचा दाखला कसा मिळवायचा याबद्दल, विभागाच्या अधिकाऱ्यांनी, या निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन केले. हयातीचा दाखला 60 सेकंदात तयार होतो आणि त्या पाठोपाठ मोबाईल फोनवर आलेल्या लिंक वरुन ते डाउनलोड केले जाऊ शकते. डिजिटल जगात, भारत सरकारच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने घेतलेली ही मोठी झेप आहे. पूर्वी हयातीचा दाखला प्रत्यक्ष जाऊन घेण्यासाठी वृद्ध निवृत्तीवेतन धारकांना बँकांबाहेर तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. आता, आपापल्या घरात एका बटणाच्या क्लिकवर ते अगदी आरामात शक्य झाले आहे, असे विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांच्या पथकाने भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला भेट दिली आणि निवृत्तीवेतनधारकांशी संवाद साधला. डिजिटल स्वरुपातील जीवन प्रमाणपत्र, त्यांच्या सुखकर निवृत्त्योत्तर आयुष्यासाठी कसे लाभदायक ठरते याची माहिती त्यांनी यावेळी या निवृत्तीवेतनधारकांना दिली. या प्रक्रियेचे डिजिटलीकरण करून त्यांना विनासायास या प्रक्रियेचा लाभ मिळवून देऊ शकणाऱ्या, विभागाच्या नवीन उपक्रमाची ओळखही निवृत्तीवेतनधारकांना यावेळी करून देण्यात आली. पथकाने सर्व निवृत्तीवेतनधारकांना, DOPPW_INDIA OFFICIAL या विभागाच्या अधिकृत यू ट्यूब चॅनेलला भेट देण्याची विनंती केली. या यूट्यूब चॅनेलवर, फेस ऑथेंटिकेशन तंत्राद्वारे हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया साध्या सोप्या भाषेत स्पष्ट करुन दाखवणाऱ्या दोन ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
डिजिटल जीवन प्रमाणपत्रांची एक ऑक्टोबर 2022 ते 12 नोव्हेंबर 2022 पर्यंतची आकडेवारी याप्रमाणे
हयातीच्या डिजिटल दाखल्यांची एकूण संख्या=46,92,442
फेस ऑथेंटिकेशन द्वारे हयातीच्या डिजिटल दाखल्यांची एकूण संख्या=2,51,415
केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना देण्यात आलेल्या हयातीच्या डिजिटल दाखल्यांची एकूण संख्या=17,91,635
केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना फेस ऑथेंटिकेशन द्वारे देण्यात आलेल्या हयातीच्या डिजिटल दाखल्यांची एकूण संख्या=1,54,095
ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, पुणे आणि डिफेन्स अकाउंट्स पेन्शनर्स असोसिएशन, पुणे, या निवृत्तीवेतनधारकांच्या पुणे येथील दोन संघटना, निवृत्तीवेतनधारकांना फेस ऑथेंटिकेशन द्वारे हयातीच्या डिजिटल दाखल्यांसंदर्भातल्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होत आहेत. या संघटनांतर्फे पुण्यातील विविध ठिकाणी दररोज विशेष शिबिरे घेण्यात येत आहेत. वृद्ध, दुर्बल आणि आजारी निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल हयातीचा दाखला मिळवून देण्यासाठी ते घरोघरी आणि अगदी रुग्णालयांनाही भेट देत आहेत.
मोबाईल फोन वापरून फेस ऑथेंटिकेशन द्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत, प्रथमच आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक/टपाल कार्यालयातील खाते क्रमांक असे संबंधित तपशील आवश्यक ठरत आहेत. राज्याचे कोषागार कार्यालय म्हणून वितरण प्राधिकरणाचे अधिकार असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही ही सुविधा उपलब्ध आहे.
या कार्यक्रमाला भारतीय स्टेट बँक, निवृत्तीवेतनधारकांच्या संघटना , भारतीय विशेष ओळख प्राधिकरण यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. ही मोहिम यशस्वी होण्यासाठी या मंडळींचा सहभाग अमूल्य होता.
फेस ऑथेंटिकेशन द्वारे हयातीचा सादर करण्यासाठीची ही मोहीम, विभाग संपूर्ण नोव्हेंबर महिनाभर राबवत आहे.