चंदिगड-रोडरेज प्रकरणी पतियाळा सेंट्रल जेलमध्ये गेलेले नवज्योत सिद्धू आता कैदी क्रमांक 241383 झाले आहेत. 34 वर्षे जुन्या एका प्रकरणात सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.कारागृहात गेल्यानंतर त्यांना हा कैदी क्रमांक देण्यात आला आहे.पहिले त्यांना वाचनालयाच्या आवारात ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर कैदी क्रमांक देऊन 10 क्रमांकाच्या बॅरेकमध्ये हलवण्यात आले. येथे त्यांना खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या 8 कैद्यांसह ठेवण्यात आले आहे. बॅरेकमध्ये सिद्धू यांना सिमेंटच्या ओट्यावर झोपावे लागेल.शुक्रवारी संध्याकाळी 7.15 वाजता सिद्धूंना जेल नियमानुसार डाळ-रोटी देण्यात आली. मात्र, प्रकृतीचे कारण देत त्यांनी खाण्यास नकार दिला. त्यांनी फक्त सॅलड आणि फळे खाल्ले. त्याचवेळी, सिद्धूंचे कट्टर प्रतिस्पर्धी बिक्रम मजिठिया यांची बॅरेक सिद्धूपासून 500 मीटर दूर आहे. मजिठिया 11 क्रमांकाच्या बॅरेकमध्ये आहेत. ड्रग्ज प्रकरणात ते तुरुंगात आहेत. सिद्धू आणि मजिठिया यांच्या बॅरेकबाहेरही सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
तुरुंगात सिद्धूंना कैद्यांचे पांढरे कपडे घालावे लागणार आहेत. सिद्धू यांना तुरुंगात एक खुर्ची-टेबल, एक वॉर्डरोब, 2 पगड्या, एक घोंगडी, एक पलंग, तीन अंतर्वस्त्रे आणि बनियान, 2 टॉवेल, एक मच्छरदाणी, एक कॉपी-पेन, एक जोडे, 2 बेडशीट, दोन उशांचे कव्हर आणि 4 कुर्ते. पायजमा हे सामान देण्यात आले
सिद्धू यांना यकृताची समस्या आहे. याशिवाय पायात पट्टाही बांधलेला आहे. सिद्धू यांचे मीडिया सल्लागार सुरिंदर डल्ला यांनी सांगितले की, सिद्धू यांना गव्हाची अॅलर्जी आहे. ते गव्हाची रोटी खाऊ शकत नाहीत. ते बऱ्याच दिवसांपासून रोटी खात नव्हते. त्यामुळेच त्यांनी विशेष आहार मागितला आहे. याबाबतची माहितीही त्यांनी काल मेडिकलमध्ये दिली आहे
दिनक्रम
सिद्धूंचा तुरुंगातील दिवस पहाटे 5.30 वाजता सुरू होईल. सकाळी ७ वाजता चहासोबत बिस्कीट किंवा काळे हरभरे दिले जातील. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता नाश्ता होईल. ज्यामध्ये रोटी आणि डाळ किंवा भाजी मिळेल. त्यानंतर त्यांना कारखान्यात कामासाठी नेले जाईल. तेथे त्यांना दिवसभर काम करावे लागते. सायंकाळी 5.30 वाजता त्यांची सुटी होईल. संध्याकाळी 6 वाजता त्यांना जेवण मिळेल. सायंकाळी ७ वाजता त्यांना बॅरेकमध्ये बंद करण्यात येणार.