नवी दिल्ली – निर्भया प्रकरणात पतियाळा हाउस कोर्टाने आज चारही दोषींसाठी तिसरा डेथ वॉरंट जारी केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानुसार, या चौघांना येत्या 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार आहे. यातील एक गुन्हेगार विनय शर्मा तिहार तुरुंगात उपोषणावर बसल्याची कोर्टाला माहिती देण्यात आली. तर दोषी अक्षय ठाकूरच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे, अक्षयने राष्ट्रपतींकडे नव्याने दया याचिका पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
यासंदर्भात सोमवारी सकाळी सुनावणीच्या वेळी दोषी मुकेश सिंहने कोर्टाला सांगितले, की वृंदा ग्रोव्हर यांनी त्याची वकिली करू नये. यानंतर कोर्टाने त्याच्यासाठी वकील रवी काझी यांची नियुक्ती केली. विनयच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले, की विनय मानसिकरित्या आजारी आहे. त्यामुळे, त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. दोषी पवन गुप्ताच्या वकिलांनी कोर्टात म्हटले, की पवनने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पेटिशन आणि राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यास इच्छुक आहे. चार गुन्हेगारांपैकी केवळ एक पवनकडे अजुनही क्यूरेटिव्ह पेटिशन आणि दया याचिका करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
निर्भयाच्या पालकांनी दाखल केला होता अर्ज
पीडितेच्या आई-वडिलांनी आणि दिल्ली सरकारने नवीन डेथ वॉरंट जारी करण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला होता. 15 फेब्रुवारी रोजी दोषींना वेग-वेगळी फाशी देण्यासंदर्भात केंद्राच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सांगितले होते, की केंद्राची याचिका प्रलंबित राहिली तरी कनिष्ठ न्यायालयातील फाशीच्या डेथ वॉरंटवर काहीच परिणाम होणार नाही. 14 फेब्रुवारी रोजी दोषी पवनने न्यायालयात सांगितले होते की त्याने जुन्या वकिलाला हटवले आहे. तर नवीन वकिलांसाठी त्याला वेळ हवा आहे. यानंतर कोर्टाने त्याच्या अधिकारांवर भाष्य करताना नवीन वकील नियुक्त केले होते. यावरच पीडितेच्या आई भावूक झाल्या होत्या. “गेल्या 7 वर्षांपासून आपण न्यायाची प्रतीक्षा करत आहोत. मी पण एक मानव आहे, माझ्या हक्काचे काय? मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करते की कृपया डेथ वॉरंट जारी करा.” साश्रू नयनांनी त्यांनी कोर्टाला ही विनंती केली होती.
यापूर्वी दिलेले दोन डेथ वॉरंट झाले रद्द
पतियाळा हाउस कोर्टाने 7 जानेवारी दिलेल्या निकालामध्ये दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फाशी देणार असा वॉरंट जारी केला होता. यानंतर एका दोषीची दया याचिका राष्ट्रपतींकडे विचाराधीन असल्याने दोषींची फाशी होऊ शकली नाही. यानंतर ट्रायल कोर्टाने 17 जानेवारी रोजी दोषींच्या विरोधात दुसरे डेथ वॉरंट जारी केले. त्यामध्ये सर्व दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी दिली जाणार असे सांगण्यात आले होते. पण, 31 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने पुढील आदेशापर्यंत ही तारीख सुद्धा रद्द केली. त्यात सोमवारी जारी करण्यात आलेला आदेश कोर्टाने दिलेले तिसरे डेथ वॉरंट आहे.