चंकी पांडेसह NCBच्या कार्यालयाकडे रवाना झाली अनन्या पांडे
शाहरुखच्या घरी छापेमारी नाही , केवळ तपासासाठी काही गोष्टी मागितल्या- एनसीबी डीडी अशोक जैन यांचे म्हणणे
मुंबई-नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुरुवारी शाहरुख खान आणि अनन्या पांडे यांच्या घरांवर छापा टाकल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते . एनसीबीने अनन्याला आज दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावले होते. आता ती एनसीबीच्या कार्यालयाच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. यावेळी तिचे वडील चंकी पांडे आणि वकील तिच्यासोबत आहेत. आज सकाळी एनसीबीचे पथक अनन्याच्या घरी दाखल झाले होते. तिचे घर वांद्रा येथे आहे. एनसीबीने अनन्याचा फोन जप्त केला आहे.वृत्तानुसार, एनसीबीला या प्रकरणात आर्यन खानसोबत एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीचे चॅटदेखील मिळाले आहेत. ही नवोदित अभिनेत्री अनन्या पांडेच असल्याचे आता समोर आले आहे.
दुसरीकडे कारवाईदरम्यान शाहरुख घरी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.यावेळी शाहरुखच्या घरी छापेमारी झाली नसून केवळ तपासासाठी काही गोष्टी मागितल्याचे एनसीबी डीडी अशोक जैन यांनी माध्यमांना सांगितले आहे. आर्यनशी संबंधित काही कागदोपत्री काम पूर्ण करण्यासाठी एनसीबीचे पथक आर्यनच्या घरी पोहोचले होते. या पथकाने आर्यनच्या घरी नोटीस दिली. त्यानुसार जर त्याची कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे कुटुंबाकडे असतील तर ते एनसीबीच्या ताब्यात देण्यात यावी.
ड्रग्ज प्रकरणात याचिका फेटाळल्यानंतर तुरुंगात असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आज सकाळी मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. वडील आणि मुलाची ही भेट सुमारे 18 मिनिटांची होती. मात्र, जेल प्रशासन नियमानुसार ही भेट केवळ 10 मिनिटांची असल्याचे सांगत आहे.
आर्यनचे अभिनेत्रीसोबतचे ड्रग चॅट एनसीबीला मिळाले-NCB हाती लागलेल्या आर्यनच्या काही चॅटमध्ये तो एका नवोदित अभिनेत्रीसोबत ड्रग्जवर चर्चा करताना दिसतोय. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले. असेही म्हटले जात आहे की ही अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीने तिला सोडून दिले होते.