मुंबई: श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान आणि परिसर विकासासाठी 148.37 कोटी रु चा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात आज त्यांनी या विषयाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या आराखड्यातील कामे दर्जेदार पद्धतीने आणि वेगाने पणे पूर्ण व्हावीत अशा सूचना देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले, आराखड्यातील जी कामे पूर्णत्वाला आली आहेत ती श्रावणापूर्वी पूर्ण होतील असे पाहावे. आराखड्यात सामूहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरीमार्ग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते विकास, मंदिर परिसर संवर्धन, भाविकांसाठी पायाभूत सोयी सुविधा, पाणी पुरवठा योजना, भुयारी गटर योजना ,घन कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा, महादेव वन, विश्रामगृह, अशा विविध कामांचा समावेश आहे अशी माहिती देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले, येथे उभारण्यात येत असलेल्या महादेव वन प्रकल्पांतर्गत विविध 12 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. येथे बेलाची 150 तर रुद्राक्षाची 100 झाडे लावली गेली आहेत. आराखड्यातील 14 कामे प्रगतीपथावर आहेत. भाविकांसाठी 20 मिडी बसेसची सेवा लवकरच सुरू होत आहे. पर्यटन विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या बॅटरी ऑपरेटेड गाड्या ही श्रावणापूर्वी सुरू होतील अशी अपेक्षा आहे. मंदिराला साजेशी कामे करताना ती उत्तम दर्जाची होतील याची काळजी घेतली गेली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. मंदिराला लाखो भाविक भेट देतात हे लक्षात घेऊन करण्यात येणारी कामे नावीन्यपूर्ण रितीने केली जावीत. डमरू, वाहनतळ, लॉकर, कापडी पिशव्या तयार करण्याची कामे , बेलाच्या पानाच्या खताचा प्रकल्प अशी विविध कामे यात केली जावीत. भक्तांना जप आणि आराधना करण्यासाठी एक हॉल तयार केला जावा, यज्ञ करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी एक यज्ञकुंड तयार केले जावेत, ओम नमः शिवाय चा जप करणारा नंदी उभारला जावा, दिव्यांगासाठी, जेष्ठ नागरिकांसाठी दर्शनाला जाण्याची व्यवस्था निर्माण केली जावी. रोजगार निर्मितीबरोबर नाविन्यपूर्ण कल्पनांच्या अंमलबजावणीत स्थानिकांचा सहभाग घेतला जावा, अशा सूचना ही वित्त मंत्र्यांनी दिल्या.