मुंबई (प्रतिनिधी )- ज्या संघटनेच्या नावाला आक्षेप घेत , काही व्हाटसऐप ग्रुप वर चर्चा उसळली आहे अशा नव्याने स्थापन झालेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाने आज सांस्कृतिक मंत्र्याकडून मराठी चित्रपट निर्मात्यांचे थकीत अनुदान महिनाभरात देण्यात येईल असे आश्वासन मिळविले आहे अशी माहिती येथे इम्पाचे संचालक आणि या नव्या निर्माता महामंडळाचे पदाधिकारी बाळासाहेब गोरे यांनी दिली .
ते म्हणाले ,’आज सोमवार दिनांक २० मे रोजी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयातील कार्यालयात अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली . यावेळी निर्मात्यांच्या विविध समस्यांच्या निरासन करण्याच्या उपाय योजनेबाबत ४५ मिनिटे चर्चा केली. व त्यांना लेखी निवेदन दिले. मराठी चित्रपटाचे २०१७-१८ पासून अनुदानच्या थकित रक्कमेचे वितरण निर्मात्यांना ताबडतोब मिळाले पाहिजे म्हणून आग्रह धरला. त्यावर मंत्रीमहोदयांनी निवडणूक आचारसंहिता संपताच येत्या १५ ते २० दिवसात आतापर्यंत थकीत सर्व पात्र चित्रपटांना अनुदान रक्कमेचे वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच मराठी चित्रपटाच्या वितरणासाठी मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे चित्रपट प्रदर्शित करण्याकरिता दिवस आणि शो ची वेळ उशीरा देत असल्याने चित्रपटाची योग्य जाहिरात करता येत नाही अशा नेमक्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली असून त्या बाबत काही उपाय योजनाही सुचविलेल्या आहे त्यासाठी लवकरच पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात अध्यक्ष देवेंद्र मोरे, बाळासाहेब गोरे महाराष्ट्रध्यक्ष, सेक्रेटरी महेश बनसोडे,सहखजिनदार राजेंद्र बोडारे, सद्स्य बळीराम गावड, सतशील मेश्राम,बाल कलाकार सोहा आदि मान्यवर उपस्थित होते. असे त्यांनी पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हि सर्वात जुनी आणि शासनाकडून विविध अधिकार प्राप्त अशी संघटना आहे . या संघटनेच्या नावाशी या नव्या संघटनेच्या नावाचे साधर्म्य असल्याने काहींनी यावर जोरदार हरकती व्हाटस ऐप चर्चेतून घेतल्या आहेत .हरकती घेणारे मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालक मंडळाचे समर्थक आणि हि नवी संघटना असे २ गट आता निर्मात्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत .कोणाच्याही माध्यमातून यश येवो ,पण मराठी चित्रपट सृष्टी आणि निर्माते ,आणि सर्व स्तरावरील कलाकार अडचणीतून बाहेर येवोत असे मानणारा हि तिसरा मतप्रवाह हि येथे आहे .