पुणे, दि. 27 फेब्रुवारी 2021: डोंगरगाव (ता. हवेली) येथील एकाच रोहित्रावरील 13 शेतकऱ्यांनी कृषिपंप धोरण 2020 अंतर्गत सुधारित मूळ थकबाकीपैकी 2 लाख 83 हजार रुपये या 50 टक्के रकमेचा भरणा करीत वीजबिल कोरे केले आहे. त्यांना महावितरणकडून तातडीने नवीन रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतर तीन शेतकऱ्यांनी देखील 1 लाख 60 हजार रुपयांचा भरणा करून वीजबिलांची थकबाकीमुक्ती मिळविली आहे.
याबाबत माहिती अशी की, हडपसर ग्रामीण उपविभाग अंतर्गत डोंगरगाव येथील कामठे वस्ती, शिंदे वस्ती येथील रोहित्र नादुरुस्त झाले होते. या रोहित्रावर 13 शेतकऱ्यांना कृषिपंपाची वीजजोडणी देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडे एकूण 6 लाख 88 हजार रुपयांची वीजबिल थकीत होते. पेरणे येथील महावितरणचे शाखा अभियंता श्री. अंकुश मोरे, जनमित्र श्री. राहुल लेंडे यांनी डोंगरगाव येथे जाऊन गावातील शेतकऱ्यांना कृषिपंप धोरण 2020 मधील थकबाकीमुक्तीची माहिती दिली.
कृषी धोरणाचा फायदा घेत या रोहित्रावरील सर्वच 13 शेतकऱ्यांनी सुधारित मूळ थकबाकीपैकी 2 लाख 83 हजार रुपयांचा भरणा केला. त्यांना एकूण थकबाकीमध्ये तब्बल 4 लाख 5 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. सोबतच महावितरणकडून नादुरुस्त झालेले रोहित्र तातडीने बदलून देण्यात आले. यासोबतच गावातील आणखी 3 शेतकऱ्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांचा भरणा करून कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्ती मिळविली आहे. यासाठी श्यामराव पाटील, गुलाब अण्णा गायकवाड यांनी स्वतः या योजनेचा लाभ घेत गावातील शेतकऱ्यांना वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला.