मुंबई- सामाजिक बांधिलकी जोपासत महावितरणच्या सुमारे ५ हजार ८२६ कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ११) एकाच दिवशी राज्यभरातील विविध कार्यालयांत आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेत रक्तदानाचे महादान केले. शासकीय रुग्णालयांतील गोरगरीब रुग्णांना या रक्तदानाचा फायदा होणार आहे. एखाद्या शासकीय कार्यालयाने संपूर्ण राज्यात एकाच वेळी रक्तदान शिबीराची एवढ्या मोठ्या संख्येत यशस्वी आयोजन करणे व त्यात एवढ्या मोठया प्रमाणात कर्मचाऱ्यांनी सक्रीयपणे सहभागी होणे अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून या उपक्रमाचे सार्वत्रिक कौतूक होत आहे. बारामती परिमंडलात सर्वाधिक ८०२ कर्मचा-यांनी रक्तदान केले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले . त्या आव्हानास मोठा प्रतिसाद देत महावितरणकडून राज्यातील विविध कार्यालयात ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ५ हजार ८२६ कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आज रक्तदान करून महादानाचे कर्तव्य बजावले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करून या राज्यव्यापी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडीयर (सेवानिवृत्त) पवन कुमार गंजू, कार्यकारी संचालक सर्वश्री चंद्रशेखर येरमे, प्रसाद रेशमे, अरविंद भादीकर, दत्ता शिंदे उपस्थित होते. या सर्वांनी शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान करुन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी केईम रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय पथकांनी आयोजनासाठी सहकार्य केले. तसेच राज्यभरातील रक्तदान शिबिरासाठी शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालये व रक्तपेढ्यांनी सहकार्य केले तर महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्य रक्तदानासाठी सकाळपासूनच उस्फुर्तपणे सहभागी होत होते. रक्तदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.
रक्तदानामध्ये परिमंडलनिहाय सहभागी झालेले महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या परिवारातील एकूण सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे – मुख्य कार्यालय प्रकाशगड-१६४, बारामती परिमंडल-८०२, पुणे परिमंडल -११७, कोल्हापूर परिमंडल -६९२, रत्नागिरी परिमंडल-३७, नाशिक परिमंडल- ५००, औरंगाबाद परिमंडल -२३२, नांदेड परिमंडल-३०८, अकोला परिमंडल-४३०, नागपूर परिमंडल- ६३६, अमरावती परिमंडल-३६७, चंद्रपूर परिमंडल-३५६, गोदिया परिमंडल-११०, लातूर परिमंडल-३८५, कल्याण परिमंडल-२९९, भांडूप परिमंडल- २४६, जळगांव परिमंडल- १४५
राज्यव्यापी रक्तदानाच्या महादानात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, संचालक सर्वश्री. दिनेशचंद्र साबू, सतीश चव्हाण, जयकुमार श्रीनिवासन, भालचंद्र खंडाईत, ब्रिगेडीयर पवनकुमार गंजू, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्री. चंद्रशेखर येरमे यांनी कौतुक केले असून या रक्तदान शिबीराला सहकार्य करणाऱ्या शासकीय व निमशासकीय रक्तपेढ्यांच्या वैद्यकीय पथकांचे आभार मानले आहे.