मुंबई -महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने मंगळवारी कथित बुकी अनिल जयसिंघानी याला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयाने जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिच्या पोलीस कोठडीत 24 मार्चपर्यंत वाढ केली आहे.
अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून एक दिवस आधी अटक करण्यात आली होती. त्याला मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी अलमाले यांच्यासमोर हजर करण्यात आले. अमृता फडणवीस यांनी अनिल जयसिंघानी या गुन्हेगारी प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी लाच दिल्याचा आणि तिला धमकी दिल्याचा आरोप केल्यानंतर मुंबई पोलिसांनी 16 मार्च रोजी अनिक्षा अनिल जयसिंघानी या डिझायनरला अटक केली होती.प्राथमिक रिमांड संपल्यानंतर अनिक्षाला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांनी पुढील चौकशीसाठी आवश्यक असल्याचे सांगितल्याने न्यायालयाने तिच्या कोठडीत वाढ केली. या पिता-पुत्रीवर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हेगारी कट आणि खंडणी व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल जयसिंघानी यांच्याविरुद्ध किमान १७ खटले प्रलंबित आहेत, असे पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते.
अनिक्षा सट्टेबाज अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिल यांच्यावर महाराष्ट्र, गोवा व आसामच्या सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देणे, फसवणूक करणे आदी विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अनिक्षा लॉ ग्रॅज्युएट आहे. ती उल्हासनगरमध्ये राहते. डिझायनर असल्याचा दावा करणारी अनिक्षा गत अनेक दिवसांपासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची अनिक्षाशी 2021 मध्ये भेट झाली. तेव्हापासून त्या एकमेकींच्या संपर्कात आहेत. अनिक्षाने अमृतांना आपल्याला आई नसल्याचे सांगितले होते. तसेच आपण डिझायनर असल्याचाही दावा केला होता. तिने आपल्या प्रमोशनसाठी अमृता यांना सार्वजनिक कार्यक्रमात आपले कपडे व दागिणे घालण्याची विनंती केली होती. अमृता यांच्या मते, त्यांनी अनिक्षाची विनंती मान्य केली.
अमृता फडणवीस यांनी आरोप केला आहे की, अनिक्षाने आपल्या वडिलांच्या मदतीने त्यांना धमकी दिली. त्यांच्याविरोधात कट रचला. त्यानुसार पोलिसांनी अनिक्षा व तिच्या वडिलांविरोधात भादंवि कलम 120 ब (कट) व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमृता यांनी गत 20 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या मलबार हिल पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती.
दुसरीकडे, विरोधकांनी गुरुवारी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले – माझ्या पत्नीला लाच देण्याप्रकरणी व तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. डिझायनरने अमृता यांना धमकी दिली होती की, तिच्या फरार वडिलांविरोधातील गुन्हे मागे घेण्यात आले नाही तर मी तुम्हाला अडचणीत आणू शकते.
फडणवीस पुढे म्हणाले की, अनिक्षा मागील दीड वर्षांपासून माझ्या पत्नीच्या संपर्कात होती. ती घरी येत-जात होती. तिच्या वडिलांवर 14-15 गुन्हे दाखल आहेत. ते फरार आहेत. अनिक्षाही सुशिक्षित आहे. ती 2015-16 मध्ये अमृता यांना भेटली. त्यानंतर तिने त्यांचा विश्वास जिंकला.
फडणवीस यांच्या माहितीनुसार, 2021 मध्ये तिने पुन्हा अमृता यांच्याशी संपर्क साधला. तसेच आपण डिझाइन केलेले कपडे घालण्याची विनंती केली. तिने आपल्या वडिलांची माहितीही अमृता यांना दिली. तिने आपल्या वडिलांना चुकीच्या प्रकरणांत अडकवण्यात आल्याचे सांगितले. तिने या प्रकरणी अमृता यांची मदत मागितली होती