मुंबई दि. ११: निराश न होता सातत्याने काम करत राहणं ही अविनाश महातेकर यांची ओळख आहे. आमदार खासदारांपेक्षा अधिक चांगला अभ्यास, वक्तृत्व त्यांचं आहे. यासोबतच ते उत्तम लेखक आहेत. त्यांच्या लिखाणाचा उपयोग पुढच्या काळात देखील लोकांना व्हायला पाहिजे. सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असलेले श्री. अविनाश महातेकर हे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील नेते असल्याची भावना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) राष्ट्रीय सरचिटणीस श्री. अविनाश महातेकर यांचा अमृत महोत्सवी सोहळा आज सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहत श्री. महातेकर यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांनी शाल, भेटवस्तू देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. तसेच श्रीमती. महातेकर यांना साडी देऊन त्यांचाही सत्कार डॉ. गोऱ्हे यांनी केला.