जालना-
जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा 12 वा दिवस आहे. राज्य सरकारचा निरोप घेऊन माजी मंत्री अर्जुन खोतकर आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील आज आंदोलन मागे घेणार की, वेगळी भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल आंदोलक शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्यांनी ही चर्चा सकारात्मक झाल्याचे म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज बारावा दिवस असून अद्याप राज्य शासन आणि उपोषणकर्ते यांच्यात तोडगा निघालेला नाही.
– मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला असला, तरी सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही.
– मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री आणि राज्य सरकारसोबत सविस्तर चर्चा केली. रात्री एक वाजेपर्यंत ही चर्चा चालली. त्यानंतरही या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय एका बंद लिफाफामध्ये पॅक करण्यात आला आहे. हा निर्णय आज दुपारी मनोज जरांगे यांच्याकडे देण्यात येणार आहे.
– राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा न्यायालयात टीकला पाहिजे, त्यासाठी विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे, राज्य सरकारचे मत आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्णय मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या सहकाऱ्यांची चर्चा करून आपल्या उपोषणाबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
– आंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचा आज बारावा दिवस आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावे, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.