आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामध्ये आतापर्यंत 296 जणांचा मृत्यू झाला आहे. यूएस स्टेट जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, या भागात 120 वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्याचं मोरोक्कोच्या सरकारी वाहिनीने सांगितले. भूकंपाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक धावताना दिसत आहेत.

भूकंपाचा केंद्रबिंदू अॅटलस पर्वताजवळील इघिल नावाचे गाव असल्याचे सांगण्यात येत आहे. ते माराकेश शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. भूकंपाची खोली जमिनीपासून 18.5 किलोमीटर खाली होती. पोर्तुगाल आणि अल्जेरियापर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के.
भूकंपामुळे इमारतींचे अक्षरशः ढिगारे बनले. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या ऐतिहासिक माराकेचमध्ये पर्यटकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भिंतीच्या काही भागाचेही नुकसान झाले. यूएस जियोलॉजिकल सर्वेनुसार उत्तर आफ्रिकेत भूकंप अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी 1960 मध्ये अगादीरजवळ 5.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यावेळी हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.