पंढरपूर, दि. 08 : सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार मागील वर्षी दिवाळीमध्ये तसेच गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधाचे रास्त दुकानातून वितरण करण्यात आले होते. आता गौरी गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आनंदाचा शिधाचे वितरण करताना पुरवठा विभागाने एकल महिलांना शिधा वितरण करताना कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केल्या.
शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, उपविभागीय अभियंता भीमाशंकर मेटकरी तसेच उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर उपस्थित होते.
यावेळी उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी पंढरपुरातील तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेल्या व झालेल्या कामांची माहिती घेतली. पंढरपूर शहर व तालुक्यातील पाणीटंचाई, चारा टंचाई याबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच मंदिर समिती मार्फत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. त्याचबरोबर संभाव्य दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमीची कामे तत्काळ सुरू करावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई , चारा टंचाई बाबत करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती दिली. तसेच तालुक्यात कमी पावसामुळे पेरणीचे प्रमाण कमी झाले असून ४० टक्के उत्पादकता कमी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर आनंदा शिधा वितरणाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.
उप सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्यपूजा करून घेतले दर्शन
राज्याच्या विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी आज श्री विठ्ठलाची नित्यपुजा करुन श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती जेहलम जोशी उपस्थित होत्या. तसेच मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नित्योपचार विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.
श्री. विठ्ठलाच्या पूजेवेळी श्रीमती. अनुसया फसळकर यांनी म्हटलेला काकडा डॉ. गोऱ्हे यांना प्रचंड भावला असून, शक्य असल्यास मंदिर प्रशासनाने या काकड्याचे शब्दांकन करावे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच घरामध्ये पिढ्यानपिढ्या श्रावण महिन्यात पंढरपूरच्या श्री. विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे. त्यानिमित्ताने आज विठ्ठलाची सेवा करण्याचा लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. हे संकट दूर व्हावे आणि पाऊस पडावा असे साकडे त्यांनी श्री विठ्ठल चरणी घातले.