मराठवाड्यातील मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य करत राज्य सरकारने गुरुवारी त्याबाबतचा जीआर काढला. मात्र त्यात निजामकालीन वंशावळीचे पुरावे देण्याची जाचक अट आहे. आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे १० दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेलेे मनोज जरांगे पाटील यांना मात्र ती मान्य नाही.सरकारने ही जाचक अट काढून राज्यातील सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सुधारित जीआर काढावा, अन्यथा पाणीही पिणार नाही, अशी भूमिका जरांगेंनी सरकारचे दूत अर्जुन खोतकरांकडे स्पष्ट केली. त्यासाठी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चेची विनंती खोतकरांनी केली. ती मान्य करत “मी नाही पण माझे शिष्टमंडळ चर्चा करेल,’ असे जरांगे पाटील म्हणाले. तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले.
आरक्षणासाठी पाटोद्यात शेतकऱ्याची आत्महत्या
पाटोदा – नापिकी आणि मराठा आरक्षणासाठी पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील गोविंद गोपीचंद औटे (४५) या शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीत गोविंद यांनी मराठा आरक्षणामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यांना तीन एकर शेती आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
धाराशिव जिल्ह्यांत वाहने पेटवली
गेवराई बसस्थानकात गुरुवारी मध्यरात्री संभाजीनगर-अहमदपूर बस (एमएच २० बीएल ३९०८) तिघांनी पेटवून दिली. बसमध्ये झोपलेल्या १० प्रवाशांना चालक, वाहकांनी उतरवल्याने ते बचावले. गौंडगाव येथील विशाल अवधूत सोलाट, गेवराईचे अशोक बन्सी मस्के, राहुल नानाभाऊ मोटे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
उर्दू शिक्षकांचा शोध }निजामाच्या काळातील कागदपत्रे झाली जीर्ण
मराठवाड्यातील जि.प. शाळांत १९५६ नंतरच्या निजामकालीन नोंदी शोधण्याचे काम सुरू झाले आहे. ही कागदपत्रे जीर्ण झाली आहेत. ती उर्दूत असल्याने प्रशासनाने उर्दू शिक्षकांचा शोध सुरू केला आहे.
सांगली बंद -बसस्थानक परिसरात टायर जाळून केला सरकारचा निषेध
मराठा अारक्षणाच्या समर्थनार्थ सांगली, इस्लामापूर, विटा, जत, आटपाडी शहरातही गुरुवारी बंद पाळण्यात आला. सांगलीच्या बसस्थानकात काही आंदोलकांनी टायर पेटवल्याने तणाव निर्माण झाला होता.
उमरग्यात उद्रेक-आंदोलकाने रस्त्यावर उभी कार पेटवून दिली
मराठा आरक्षणासाठी माडजा (ता. उमरगा) येथे किसन माने याने बुधवारी आत्महत्या केली होती. त्याच्या मृतदेहासह ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी आंदोलन केले. एकाने रस्त्यावरील कार जाळल्याने तणाव वाढला.