मुंबई-
आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. हे कर्ज अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.या योजनेच्या अनुषंगाने सहकारी साखर कारखान्यांना त्यांच्या फेस व्हॅल्युनुसार कर्ज व तारणाचे प्रमाण १ : १.५० एवढे ठेवून एनसीडीसीच्या धर्तीवर कर्ज मंजूर करण्यात येईल. या मुदती कर्जावर मासिक पध्दतीने द.सा.द.शे. ८% व्याजदराची आकारणी केली जाईल. राज्य शासनाने निर्देशित केलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कारणासाठी या कर्जाचा विनियोग करता येणार नाही.सहकारी साखर कारखान्यास यापुर्वी मंजूर केलेल्या थकीत कर्जाची राज्य शासनाच्या हमीवर पुनर्बाधणी करण्यापूर्वी कर्जदाराने थकीत व्याजाचा संपूर्ण भरणा राज्य बँकेत करणे आवश्यक राहील. त्यानंतर उर्वरित मुद्दल अधिक नवीन कर्ज शिफारस या दोहोंसाठी २ वर्षे सवलतीच्या कालावधीसह ६ वर्षे समान १२ सहामाही हप्त्यात परतफेड अशी एकूण ८ वर्ष कर्ज परतफेडीसाठी मुदत राहील. हा सवलतीचा कालावधी केवळ या कर्जासाठी लागू राहील.कारखान्याच्या सहवीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्पातील उत्पादित उपपदार्थांच्या विक्रीतून प्राप्त होणाऱ्या रक्कमा जमा करणेसाठी राज्य बँकेत स्वतंत्र एस्क्रो खाते उघडावे लागेल व खात्यात जमा होणा-या रक्कमा कर्जखाती वर्ग करुन घेणेबाबत कारखान्याने राज्य बँकेस पॉवर ऑफ अॅटर्नी करुन द्यावी लागेल.आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना या योजनेतंर्गत एनसीडीसीप्रमाणे ६ समान वार्षिक हप्त्यात कर्ज वसूली करण्यात येईल तसेच सदर कर्जाचे वसूलीसाठी राज्य बँकेत स्वतंत्र एस्क्रो खाते उघडावे लागेल किंवा इतर बँकेत असलेल्या एस्क्रो खात्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्जाच्या प्रमाणात अधिकार राहतील.
कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियोजन करा ; पीक विमा अग्रिम,
पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था याविषयी मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 81.07 टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.राज्यात 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान केवळ 24.05 म्हणजे सरासरी 13.60 टक्के पाऊस पडला आहे. 2579 पैकी 446 महसुली भागात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला.पीक विम्याच्या अग्रिमाबाबत नियोजनयावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. नियमानुसार पीक विम्याचा अग्रिम, पिण्याचे पाणी, चारा उपलब्धता यासाठी काटेकोर नियोजन करावे असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. पावसाअभावी पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पीक विम्याची अग्रिम रक्कम कशी देता येईल याचे चांगले नियोजन करावे. किती नुकसान झाले आहे हे अचूकरित्या काढणे, यंत्रणांमध्ये समन्वय राहील हे पाहण्याचे निर्देश त्यांनी दिले. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करता येईल हे आम्ही पहात आहोत असेही ते म्हणाले.यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी सादरीकरण केले. यावर्षी पाऊस महाराष्ट्रात उशिराने दाखल झाला होता. उशिरा येऊनही जून महिन्यात सरासरी 111.5 मिमी म्हणजे सरासरीच्या 53.7 टक्के पाऊस पडला. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली सरासरी पर्जन्यमानाच्या 138.7 टक्के म्हणजेच 459.0 मिमी पाऊस जुलैत पडलेला आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली असून ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या केवळ 38.0 टक्के म्हणजे 107.9 मिमी पाऊस राज्यात पडला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही परिस्थिती कायम राहिली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सरासरीच्या 13.60 टक्के इतकाच पाऊस पडलेला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
मेरी माटी मेरा देश मधील अमृत कलश यात्रा राज्यात यशस्वी करणार; मंत्रिमंडळात सादरीकरण
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामधील मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अंतर्गत 1 सप्टेंबरपासून अमृत कलश यात्रा सुरु झाली असून राज्यामध्ये देखील 4 टप्प्यामध्ये ही यात्रा पार पडेल. याविषयी सर्व मंत्र्यांनी आपापल्या भागामध्ये ही यात्रा यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.आज मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी मंत्रिमंडळात सादरीकरण केले.राज्यातील सर्व विभाग, जिल्हा, तालुका आणि अगदी ग्रामपंचायत पातळीपर्यंत या यात्रेचा उपक्रम राबविण्यात येईल. शहर आणि गावातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, नागरिक आणि मुलं- विद्यार्थी या यात्रेत जोडावयाचे आहेत.1 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करायचा आहे. हे करतांना आनंदी आणि उत्साहाचे वातावरण हवे. वाजतगाजत ही माती आपल्याला गोळा करायची आहे.1 ते 13 ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक स्तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या स्तरावर ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून एका मोठ्या कलशामध्ये एकत्र करायची आहे. यावेळी सुद्धा आपल्या जिल्हा किंवा शहरातल्या सांस्कृतिक संस्था, एनसीसी, एनएसएस, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून कार्यक्रम करण्यात येतील. यात आपापल्या भागातले देशासाठी लढलेले आणि उल्लेखनीय कामगिरी केलेले जवान, पोलीस, स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्म्यांचे कुटुंबीय यांना बोलवून त्यांचा गौरव करण्यात येईल.22 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत ब्लॉक पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील. त्यावेळीही मोठा सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. 28 ते 30 ऑक्टोबरपर्यंत देशाच्या राजधानीत रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या अमृत वाटिकेत या कलशांची माती आणि तांदूळ लावतील.