जालना-आम्ही नाही तर सरकार आम्हाला वेठीस धरत आहे. सरकारला लागणाऱ्या सर्व कागदपत्रे आम्ही द्यायला तयार आहोत. कायदेतज्ज्ञ द्यायला तयार आहोत. त्यामुळे सरकारने आता आमचा अंत पाहू नये, आम्हाला आरक्षण देऊन न्याय द्यावा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते अतंरवाली सराटी या गावातून पत्रकारांशी संवाद साधत होते.
आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. त्यावेळी अचानक काही पोलिस कट रचून या ठिकाणी आले. त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यामुळे आम्ही आयजी यांना सांगितले की, आमची क्रॉस कंम्पलेट घ्या, असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाज आणि ओबीसी समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. असेही मनोज जरांगे म्हणाले. राजकारणी हेच आपल्याला एकमेकांच्या अडचणीत घालतात. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र आलो आहोत.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही सरकारला हवे ते पुरावे देण्यास तयार आहोत. कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी आम्ही कायदेतज्ज्ञ द्यायला तयार आहोत. त्यांना वेगळी स्वतंत्र यंत्रणा देखील निर्माण करण्याची गरज नाही. सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावे म्हणजे सरकारचा वेळ वाचेल. एक दिवसात अध्यादेश निघेल एवढे कागदपत्रे द्यायला आम्ही तयार आहोत. हैदराबाद पासूनचे सगळे कागदपत्रे आम्ही आणलेले आहेत. आपल्याकडे घरीही आहेत. हे सर्व कागदपत्रे आम्ही द्यायला तयार आहोत. यापेक्षा जास्तीचे पुरावे आहेत. त्यांना रिक्षाभरुन किंवा टिप्परभरुन पुरावे हवे असतील तर तितके आहेत. मनात इच्छा असेल तर आरक्षण देता येईल.
परत तुम्हाला असं म्हणता येणार नाही की आता अधिवेशन नाही. हे कागदपत्रे पाहिल्यावर राज्यपालांच्या परवानगीने आपण वटहुकूम काढू शकता इतके कायदेशीर पुरावे आम्ही तुम्हाला देत आहोत. सरकारने एक महिन्याची मुदत मागण्याची आवश्यकता नाही. एका दिवसात राज्यपालांची परवानगी घेऊन अध्यादेश काढू शकता, असे मनोज जरांगे सरकारला उद्देशून म्हणाले.
शिष्टमंडळाला आम्ही चार दिवस आले आहेत. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा यावे, अशी अपेक्षा अजिबात नाही. आम्ही सरकारचा वेळ वाचवत आहोत. चार दिवसात त्यांनी प्रश्न मार्गी लावला पाहिजे. हे आंदोलन चिरडायचे नाही. आंदोलन वाढवायचे देखील नाही. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर अहवाल तयार करून सरकारने निर्णय घ्यावा. सगळं पुरावे आम्ही देतो. तुम्ही वटहूकुम काढावा, यासाठी मी संवाद साधत आहोत.