सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेला संवाद वाचा जसाच्या तसा
जालना-काल मंगळवारी सरकारच्या 3 मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण जरांगेंनी आरक्षणाच्या GR शिवाय उपोषण सोडणार नसल्याचे स्पष्ट केल्याने शिष्टमंडळाला आल्यापावली परत फिरावे लागले.
मनोज जरांगे व शिष्टमंडळातील 3 मंत्री गिरीश महाजन, संदिपान भुमरे व अतुल सावेंत झालेला संवाद आता बाहेर आला आहे .वाचा तो जसाच्या तसा ….
गिरीश महाजन : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांशी बोलणे झाले आहे. मार्ग काढायचा आहे. सर्वजण पॉझिटिव्ह आहेत. कायदेशीर बाबी सोडवण्यासाठी सरकारला 1 महिन्यांचा वेळ हवा.
मनोज जरांगे : तुम्हाला 1 महिन्याचा अवधी कशाला हवा? यादीत 83 क्रमांकावर मराठा आहे. मग त्याला अहवाल कशाला हवा?
गिरीश महाजन : समिती हैदराबादला गेली. सरकार सगळे रेकॉर्ड आणत आहे. तुम्ही सोबत चला आपण बसून चर्चा करू. आता उपोषण संपवा.
मनोज जरांगे : आम्ही उपोषण नाही थांबवणार. आम्ही तुम्हाला यादी दिली. तुम्हीच समजून घ्या. तुम्ही खूप मोठे निर्णय घेतलेत. सर्व काही होते.
अर्जुन खोतकर : तुमच्या प्रयत्नाने सर्वजण पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही समाजाला वेळ द्या.
मनोज जरांगे : 83 क्रमांकावर मराठा असेल, तर वेळ कशाला? सरकारला द्यायला प्रॉब्लेम नाही. त्याला चॅलेंज होऊ शकत नाही.
अतुल सावे : त्याला सिस्टीममध्ये आणून करावे लागेल ना…
मनोज जरांगे : अहो, सिस्टिममध्येच आणलेली आहे ना यादी…. बाकी सर्व बिगर सिस्टिमचे कसे गेले? दादा तुमच्याकडे OBC ची यादी आहे. समितीला तिथेच बस म्हणा. काही गरज नाही त्यांना फिरवायची. विदर्भातील सर्व मराठा OBCमध्ये आहेत. खानदेशचा पूर्ण गेला. आम्ही काय केले मग? तुम्ही अध्यादेश काढा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल.
अर्जुन खोतकर : पाटील वेळ मिळेल काय?
मनोज जरांगे : दिला ना वेळ. मामा, आपण बसलो त्यावेळी CM साहेबांनी 1 महिना मागितला. मी तुम्हाला 3 महिने दिले. आता तुम्ही परत का वेळ मागता? आम्ही 1990 पासून विनाकारण बाहेर आहोत.
संदीपान भुमरे : नाही मिळाले तर आम्ही जबाबदार राहू.
मनोज जरांगे : नाही मिळाले तर, झाले ना समाजाचं वाटोळे. त्यापेक्षा मी असेच मेलेला बरा. आता मी शेवटचे लढतोय. आता एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल. बाळांनो जगलो तर तुमचा. मेलो तर समाजाचा.
गिरीश महाजन : एवढी टोकाची भूमिका आंदोलनात घेऊन जमत नाही
मनोज जरांगे : याला टोक नाही म्हणत साहेब. मागील 4 फेब्रुवारीपासून संघर्ष करत आहे.
संदिपान भुमरे : मरायची भाषा नाही करायची, लढायचे.
मनोज जरांगे : नाही लढतोच आहे. फक्त कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही लढाई करतोय आम्ही… शांततेची… तरी यात आमचे डोके फोडलेत तुम्ही. हे पाहा डोके फुटलेला तुमच्या समोरच बसलेला आहे.
गिरीश महाजन : सरकार अहवाल मागवत आहे.
मनोज जरांगे : अहो, अहवाल आलाय ना. अंत पाहू नका. मी तुम्हाला आणखी 4 दिवस देतो. ताणू नका साहेब. भरती जवळ आली आहे.
गिरीश महाजन : चला मुंबईला या. सरकारसोबत थेट चर्चा करा.
मनोज जरांगे : नाही, उद्या शिष्टमंडळ पाठवतो.
संदिपान भुमरे : पाटील तुम्ही चला की…
मनोज जरांगे : अहो मी उपोषणकर्ता आहे. मी कसा येणार? तुम्ही सगळे करून घ्या.
गिरीश महाजन : थोड्या अडचणी आहेत. कायदेशीर बाबी आहेत.
मनोज जरांगे : अन् मला काय कळते कायद्यातले?
गिरीश महाजन : आता तुम्ही लोकांना बोला, टोकाची भूमिका घेवू नका
मनोज जरांगे : नाही नाही. (उपस्थितांना उद्देशून) आता सरकारशी आपली चर्चा झाली. महाराष्ट्रातील समाजातर्फे आपण सर्वजण 4 दिवसांचा वेळ दिला आहे. 4 दिवसांत ते आरक्षणाचा GR घेऊन येतील. शांततेत आंदोलन करू. आपल्याला हे आरक्षण कायमस्वरूपी टिकवायचे आहे. त्यामुळे आणखी 4 दिवसांचा वेळ देऊ. स्पष्ट सांगतो. 4 दिवसानंतर अन्नपाणी सगळे बंद….