भारताचे माजी सॉलिसिटर जनरल तथा ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे (68) यांच्या तिसऱ्या लग्नात ‘फरार’ ललित मोदी दिसल्यामुळे देशात मोठी राजकीय वावटळ उठली आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) ‘सामना ‘या मुखपत्राने या प्रकरणी केंद्र तथा सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
मोदी सरकारला पाकिस्तानातून दाऊदला आणता आले नाही. ‘भगोडा’ गुन्हेगार तसेच ज्याच्याबाबत ‘लुक आऊट’ नोटीस जारी झाली आहे तो ललित मोदी समोर दिसत आहे, तोही केंद्र सरकारच्या वकिलांबरोबर ‘चिअर्स’ करताना. लोकांना मूर्ख बनविण्याचा हा धंदा आहे. सगळे चोर एक आहेत व चोरांचे सरदार दिल्लीचे सरकार चालवीत आहेत. ललित मोदीस कुणाचे संरक्षण लाभले आहे, हे साळवेंच्या तिसऱ्या लग्नाने उघड केले. तिसऱ्या लग्नाची ही गोष्ट रंजक आहे. देशाचा व्हिलन त्या लग्नात दिसल्यामुळे भाजपची पुरती नाचक्की झाली, पण निर्लज्जम् सदासुखी! भाजपचा मुखवटा हा असा रोजच गळून पडतो आहे, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे.
अग्रलेख पुढे सांगतो की, ‘एक देश एक निवडणूक’ म्हणजे ‘वन नेशन वन इलेक्शन’ अशी धुळफेक मोदी-शहांनी सुरू केली, पण ती धूळ मोदी-शहांच्याच डोळ्यांत गेली असून त्यांच्यावर आता डोळे चोळत बसण्याची वेळ आली आहे.
श्रीमान साळवे यांनी आता मोदी-शहांच्या सरकारला संकटात ढकलले आहे. त्यामुळे मोदींचा अमृतकाल काळवंडला जाऊ शकतो. साळवे यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या विवाहाची ‘हॅटट्रिक’ केली. त्यांनी तिसरा विवाह केला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला, पण साळवे यांनी त्यांच्या तिसऱ्या लग्नाच्या प्रीत्यर्थ जी मेजवानी दिली त्यात श्रीमान साळवे यांच्या सोबतीने हिंदुस्थानला हवा असलेला भगोडा ‘चिअर्स’ करताना दिसत आहे. यावर आता मोदी-शहांचे काय म्हणणे आहे? की तेही दिल्लीत बसून साळवे-ललित मोदी जोडीस ‘चिअर्स’ करणार आहेत.
ललित मोदी याने नीरव मोदी, विजय मल्ल्या, मोईन कुरेशी, मेहुल चोक्सी, नितीन संदेसरा यांच्याप्रमाणे देशातून पलायन केले आहे. ललित मोदी, मोईन कुरेशी हे हिंदुस्थानातील आर्थिक गुह्यांचा तपास करणाऱ्या सर्वच तपास यंत्रणांना हवे आहेत व त्यात ‘ईडी’सुद्धा आहे. साधारण 4500 कोटींच्या आर्थिक हेराफेरी प्रकरणात ललित मोदी गुन्हेगार आहे. प्रकरण अर्थात मनी लॉण्डरिंगचे आहे. त्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे आणि तो आज ‘भगोडा’ आहे. असा हा देशाचा भगोडा लंडनमध्ये कायदेपंडित हरीश साळवे यांच्या मेजवानीत दिसतोय व त्याच हरीश साळवे यांना ‘वन नेशन वन इलेक्शन’ समितीत माजी राष्ट्रपती व गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबरीने स्थान मिळाले.
याचा अर्थ असा की, भ्रष्टाचार उखडून काढू, परदेशात पळून गेलेल्या घोटाळेबाजांना फरफटत आणू, सर्व काळा पैसा परदेशांतून भारतात आणू या मोदींच्या फक्त थापाच थापा आहेत.
आज देशाचे चित्र काय आहे? मोदी शहांच्या माणसांबरोबर ‘भगोडा’ आरोपी ललित मोदी आरामात ‘चिअर्स’ करीत आहे. हा एक नवाच ‘सनातन धर्म’ भाजपने निर्माण केलेला दिसतोय. ‘सगळेच चोर मोदी कसे?’ या एका विधानावर राहुल गांधी यांची खासदारकी मोदी सरकारने रद्द केली, त्यांचे घर काढून घेतले, त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्या ‘चोर मंडळा’तील एक मोदी लंडनच्या पार्टीत ‘चिअर्स’ करताना संपूर्ण देशाने पाहिला. त्या मोदीला प्रेमालिंगन देणारे कायदेपंडित भारताच्या ‘एक देश एक निवडणूक’ समितीत बसतील तेव्हा देशाच्या भावना नेमक्या कशा असतील?
राहुल गांधी यांनी ‘सर्व मोदी चोर कसे?’ हे विधान करताच साळवे दुःखी झाले. राहुल गांधी यांचे विधान असंसदीय असल्याचे सांगून साळवे यांनी मोदींची (पंतप्रधान) बाजू घेतली त्यामागचे इंगित आता उघड झाले. पंतप्रधान मोदी यांनी जो नवा अमृतकाल निर्माण केला त्या अमृतकालाचे विष करणारा हा प्रकार आहे. मोदी व शहा यांना आता ललित मोदी-साळवे संबंधांवर संसदेत उत्तर द्यावे लागेल व उत्तर देताना भंबेरी उडेल म्हणून सत्ताधारी अमृतकालातले विशेष अधिवेशनही गोंधळ घालून बंद पाडतील. भाजप विरोधकांना खोटय़ा प्रकरणांत गोवणाऱ्या देशातील तपास यंत्रणा आता काय भूमिका घेणार? की ललित मोदीलाही स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे होणार?