मराठा समाजाचे आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यातील बोलणीतून अद्याप तोडगा निघालेला नसताना दुसरीकडे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराठा आंदोलनामुळे अडचणीत आलेल्या राज्य सरकारसमोरील अडचण पुन्हा वाढली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यांनी उपोषण मागे घेण्याचे राज्य सरकारचे सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकादा चांगलाच पेटला आहे. या साठी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेल्या या आंदोलनाला मागे घेण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या दरम्यान आज मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून डॉक्टरांचे पथक आंदोलनस्थळ दाखल झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळी मनोज जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यास नकार दिला होता.मनोज जरांगे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी पातळी कमी झाली आहे. तसेच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांचा बीपी वाढलेला असल्याचे त्यांच्या तपासणीतून समोर आले होते. त्यांना डॉक्टरांनी पाणी पिण्याचा सल्लाही दिला होता. मात्र, आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकार जोपर्यंत काढत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अर्जुन खोतकर यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांनी मनोज जरांगे यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. जो पर्यंत राज्य सरकार जीआर काढत नाही, तो पर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.