जालना -मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तात्काळ अध्यक्षादेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलन अद्याप संपेल असे वाटत नाही. तर दुसरीकडे एका दिवसात आरक्षण शक्य नाही, अशी सरकारची भूमिका आहे. एका दिवसात काढलेला आरक्षणाचा जीआर कोर्टात टिकणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे एक शिष्टमंडळ आज दुपारी साडेबारा वाजता मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. मात्र, त्या आधी अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या संदर्भातील जीआर काढायला अडचण नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल झाली. या बैठकीनंतर लगेचच आरक्षणाचा जीआर निघेल असे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले अर्जुन खोतकर देखील कोणतीच घोषणा न करता परत फिरले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जसाठी माफी मागितली. मात्र, आरक्षणाची कोणतीच घोषणा केली नाही. त्यामुळे या विषयाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
आरक्षणासाठी 30 दिवसांचा वेळ
मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल आणि ते कोर्टात टिकायचे असेल तर त्यासाठी वेळ द्यावा लागणार असल्याची सरकारची भूमिका आहे. या संदर्भात गिरीश महाजन, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचे शिष्टमंडळ आज मनोज जरंगे पाटील यांची भेट घेणार आहे. आरक्षणासाठी 30 दिवसांचा वेळ द्यावा, यासाठी सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात येईल. सरकारकडून 15 दिवसात कुणबीचे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
आंदोलनाची धार अधिक तीव्र करणार
आज मराठा समाजाला आरक्षण देणारा जीआर निघाला नाही तर आपण आंदोलनाची धार अधिक तीव्र करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकार अध्यादेश घेऊन आले नाही तर आजपासून पाण्याचाही त्याग करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. आज संध्याकाळी 5 नंतर मनोज जरांगे पाटील पाण्याचा त्याग करणार आहेत. ते मराठा आरक्षणासाठी अध्यादेशाच्या मागणीवर ठाम आहेत.