अपेक्षा फर्नांडिसला सातवे सुवर्णपदक
वेदांत माधवनला पाचवे सुवर्णपदक
भोपाळ-
सुवर्ण जलपरी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अपेक्षा फर्नांडिस हिने शेवटच्या दिवशी आपले सातवे सुवर्णपदक जिंकले, तर वेदांत माधवन याने रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकून या स्पर्धेतील स्वतःचे पाचवे सुवर्णपदक पटकाविले. त्यांच्या या कामगिरीमुळेच महाराष्ट्राला मुलांच्या गटात सांघिक विजेतेपद तर मुलींमध्ये सांघिक उपविजेतेपद मिळाले.

जलतरणाच्या शेवटच्या दिवसाची महाराष्ट्राची सुरुवात धृती अग्रवाल हिने मिळवलेल्या कांस्यपदकाने झाली. दोनशे मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत तिने दोन मिनिटे २८.६७ सेकंद वेळ नोंदविली. चुरशीने झालेल्या या शर्यतीत शेवटचे पन्नास मीटर्स बाकी असताना ती चौथ्या स्थानावर होती. मात्र शेवटच्या २५ मीटर्स अंतरात तिने आपला वेग वाढवीत पदकावर नाव कोरले. मुंबईच्या या खेळाडूने आजपर्यंत भरघोस पदके जिंकली आहेत. या शर्यतीत महाराष्ट्राच्या राघवी रामानुजन हिनेदेखील अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिला पदकापासून वंचित व्हावे लागले.
अपेक्षा हिने आपल्या नावावर आणखी एक सुवर्णपदक नोंदविताना पन्नास मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत ३३.९२ सेकंदात पार केली. मुंबईच्या या खेळाडूने या शर्यतीत सुरुवातीपासूनच आघाडी घेत सोनेरी कामगिरी केली. तिने या स्पर्धेत सात सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई केली. या शर्यतीत महाराष्ट्राच्या झारा जब्बार हिला मात्र पदक मिळवता आले नाही.
मुलांच्या पन्नास मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या जयवीर मोटवानी व अर्जुनवीर गुप्ता यांच्यातच पहिल्या क्रमांकासाठी चुरस झाली. मोटवानी याने हे अंतर २४.३२ सेकंदात पार केले आणि सुवर्णपदक जिंकले. मुंबईचा हा खेळाडू ऑलिंपिकपटू वीरधवल खाडे याच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. योगायोगाने काल येथे वीरधवल दाखल झाला आणि संध्याकाळी त्याच्या मार्गदर्शनाखाली मोटवानी याने सरावही केला. हे अंतर २४.४५ सेकंदात पार करणाऱ्या अर्जुनवीर याला रौप्य पदक मिळाले. अर्जुनवीर हा मुंबई येथील ऑटर्स क्लबचा खेळाडू आहे.
जलतरण स्पर्धेतील सांगताही महाराष्ट्राने रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेतेपदासह केली. ऋषभ दास, अर्जुनवीर गुप्ता, शुभंकर पत्की व वेदांत माधवन यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने चार बाय शंभर मीटर्स फ्री स्टाईल शर्यत तीन मिनिटे ३७.६५ सेकंदात पार केली. या शर्यतीत सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी महाराष्ट्राने शेवटपर्यंत टिकविली. वेदांत याने या स्पर्धेत पाच सुवर्ण व दोन रौप्य अशी एकूण सात पदके जिंकली.
आजचे पदकाचे मानकरी
कुस्ती :
नरसिंग पाटील (कांस्य)
जलतरण :
अपेक्षा फर्नांडिस (सुवर्ण),
जयवीर माेटवाणी (सुवर्ण),
महाराष्ट्र पुरुष रिले संघ (सुवर्ण)
(ऋषभ दास, अर्जुनवीर गुप्ता, शुभंकर पत्की, वेदांत माधवन),
अर्जुनवीर गुप्ता (राैप्य),
धृती अहिरवाल (कांस्य)