काँग्रेस-शिवसेनेसह 16 पक्षांचा सहभाग
नवी दिल्ली-एनडीएच्या उमेदवाराविरोधात विरोधकांनी सहमतीनं एक उमेदवार द्यायचा, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. पवारांनीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी, असा आग्रह बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच नेत्यांनी धरला. मात्र पवारांनी त्यास नकार दिला. ममता बॅनर्जींनी ही माहिती दिली. राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार ठरवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला १७ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.सुमारे दोन तासांच्या बैठकीनंतर त्यांनी गोपाल गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांच्या नावांचा प्रस्ताव मांडला. यानंतर शरद पवार यांनीही आम्ही नावांवर सर्वांशी चर्चा करत असल्याचे सांगितले.
या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेससह 16 पक्षांचा सहभाग होता. संपूर्ण विरोधी पक्षाकडे एकच उमेदवार असावा, असे सर्वांचे मत होते. या बैठकीत आम आदमी पक्ष सहभागी झाला नाही. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवैसीही निमंत्रण न मिळाल्याने नाराज झाले.
काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), सीपीआयएमएल, आरएसपी, शिवसेना, एनसीपी, आरजेडी, एसपी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, जेडी(एस), डीएमके, आरएलडी, आययूएमएल आणि जेएमएमचे नेते या बैठकीला उपस्थित होते.