महाबळेश्वर-वेण्णालेक परिसरात 5 अंश, तर संपूर्ण महाबळेश्वर शहरातील सरासरी तापमान 7 अंशांवर आले आहे. गेल्या दोन वर्षांतील नीच्चांकी तापामानाची नोंद इथे झाली आहे.सातारा जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तर थंडीची लहर पाहायला मिळत आहे. वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातील तापमान घसरल्याने या भागात दवबिंदू गोठल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Pune Tmin on Friday morning …

वेण्णालेकच्या लोखंडी जेटी, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील वाहनांच्या टपांवर, स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये फुलांवर, तसेच स्मृतिवन परिसरात पाहावे तिकडे हिमकणांचा सडा पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीने जिल्ह्याला हुडहुडी भरली असून कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी लोक शेकोट्या पेटवून ऊब घेत आहेत.
कडाक्याच्या थंडीने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. महाबळेश्वरसह वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरातील पारा कमालीचा घसरल्याने ढाबे, रेस्टॉरंटच्या बाहेर शेकोट्या पेटविल्या जात आहेत. पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना पाहावयास मिळत आहेत. मुख्य बाजारपेठेत ऊबदार कपडे खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
सातारा शहराचा पारा देखील घसरला असून मंगळवार, बुधवारी साताऱ्यातील पारा 10 अंशांवर आला. दोन वर्षातील हे नीच्चांकी तापमान ठरले. थंडीची तीव्रता वाढल्याने जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. शहरांमधील बाजारपेठेवर थंडीचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. साडेआठलाच बाजारपेठा बंद होत आहेत.
नदी काठावरच्या गावांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटवून लोक ऊब घेत आहेत. पहाटेच्या सुमारास शेत शिवार धुक्यात हरवून जात आहेत. जिल्ह्यात सध्या थंडीची लाट पाहायला मिळत आहे. ऊसतोड कामगार आणि सकाळी कामावर जाणाऱ्या कामगार वर्गाला थंडीचा सामना करावा लागत आहे.