कल्याणी ग्रुपची संरक्षण उत्पादने बनवणारी कंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि बल्गेरियाच्या आर्सेनल जॉईंट स्टॉक कंपनी यांच्यादरम्यान एका समझोता करारावर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या आहेत. भारतात छोटी शस्त्रे आणि दारुगोळा बनवण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी करण्यात आली आहे.
“एआर” ७.६२ x ३९ एमएम असॉल्ट रायफल आणि “एमजी” ७.६२ x ५१ एमएम मशीन गन सीरिज च्या उत्पादनाची क्षमता भारतात विकसित केली जावी या महत्त्वाकांक्षी उद्देशाने केएसएसएल आणि आर्सेनल या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन काम करणार आहेत. सैन्यदलाला आवश्यक असलेला विशिष्ट प्रकारचा दारुगोळा बनवण्यासाठी दहा वर्षांच्या एका कार्यक्रमात देखील या धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेतला जाईल. आर्सेनलची छोटी शस्त्रे भारतात गेली अनेक दशके वापरली जात असून त्यांची कामगिरी उत्तम असल्याचे सिद्ध झाले आहे.
केएसएसएलचे चेअरमन श्री. रजिंदर सिंग भाटिया यांनी सांगितले, “छोटया शस्त्रांच्या निर्मिती उद्योगक्षेत्रात पदार्पण करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या धोरणात्मक भागीदारीमुळे एक जागतिक दर्जाचे डिझाईन असलेले ओईएम म्हणून आर्सेनलची आजवर उत्तम कामगिरीसाठी सिद्ध झालेली तंत्रज्ञान, माहिती आणि अनुभव कौशल्ये आणि कल्याणी ग्रुपच्या विकास व उत्पादन क्षमता यांचा मिलाप होत आहे. या धोरणात्मक भागीदारीमुळे सैन्यदलाला देशात बनवलेली, उच्च दर्जाची आणि कमी खर्चाची शस्त्रे वापरता येतील. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया‘ अभियानाला पूरक ठरेल अशी ही भागीदारी आम्ही करत आहोत.”
आर्सेनल २००० जेएस कंपनीचे कार्यकारी संचालक ह्रीस्तो इबोयूचेव यांनी सांगितले, “भारतातील संरक्षण मंत्रालयाची असॉल्ट रायफल, मशीन गन आणि दारुगोळा निर्मितीमध्ये कल्याणी ग्रुपची भागीदार म्हणून मेक इन इंडिया अभियानात सक्रिय सहभाग घेणारी बल्गेरियातील पहिली डिफेन्स ओईएम बनण्याचा मान आर्सेनलला मिळत आहे ही अतिशय मानाची बाब आहे.”