नवी दिल्ली- भारतीय नौदलातर्फे आयोजित, भारत आणि जपान यांच्यातील सागरी सराव 2022 (JIMEX 22) च्या सहाव्या सत्राला बंगालच्या उपसागरात सुरूवात झाली.
जपान सागरी स्वसंरक्षण दलाच्या (JMSDF) जहाजांचे नेतृत्व, रियर अॅडमिरल हिराता तोशियुकी, कमांडर एस्कॉर्ट फ्लोटिला फोर करत आहेत तर भारतीय नौदलाच्या जहाजांचे नेतृत्व, नौदलाच्या पूर्व ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, रियर अॅडमिरल संजय भल्ला करत आहेत.
जेएमएसडीएफच्या इझुमोचे या हेलिकॉप्टर वाहक जहाजाचे आणि ताकानामी या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिकेचे बंगालच्या उपसागरात आगमन झाल्यानंतर भारतीय नौदलाच्या जहाजांनी त्यांचे स्वागत केले. स्वदेशी बनावटीच्या तीन भारतीय युद्धनौका या सरावात सहभागी होत असून त्यात सह्याद्री या रोल स्टेल्थ युद्धनौकेसह कडमॅट आणि कवरत्ती या पाणबुडी रोधक युद्धनौकांचा समावेश आहे. त्याशिवाय रणविजय हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक, ज्योती हा फ्लीट टँकर, सुकन्या ही सागरी गस्ती नौका, पाणबुड्या, मिग 29 के लढाऊ विमान, लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान तसेच जहाजावरील हेलिकॉप्टर्ससुद्धा या सरावात सहभागी होणार आहेत.
JIMEX 22 अंतर्गत सागरी सराव आणि विशाखापट्टणम येथील बंदरावरील सराव अशा दोन टप्प्यांमध्ये सराव होणार आहे.
जपानमध्ये 2012 साली सुरू झालेल्या JIMEX च्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 70 व्या वर्धापन दिनाचेही औचित्य आहे. JIMEX 22 अंतर्गत समुद्रातील, समुद्रावरच्या आणि आकाशातील खडतर सरावांच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या सागरी दलांमधील परस्पर समन्वय वाढण्यास मदत होईल.
