नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2022
कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि हरित गतिशीलता म्हणजेच पर्यावरणस्नेही इंधनावरील वाहनांच्या वापरामध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराच्या धर्तीवर भारतीय हवाई दलाने टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक वाहनांचा ताफ्यात समावेश केला आहे. 15 नोव्हेंबर 2022 रोजी हवाई दलाचे मुख्यालय, वायु भवन येथे झालेल्या सोहळ्यात या वाहनांचा ताफ्यात समावेश करण्यात आला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी अन्य वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत 12 इलेक्ट्रिक वाहनांच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला.
जुन्या झालेल्या पारंपरिक वाहनांऐवजी ई-वाहने खरेदी करून टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचा भारतीय हवाई दलाचा विचार आहे. हवाई दलाच्या विविध तळांवर चार्जिंग संबंधी पायाभूत सुविधांच्या उभारणीसह ई-वाहनांची परिसंस्था मजबूत करण्याचे नियोजित आहे. आज समावेश करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कारच्या पहिल्या तुकडीमधील गाड्यांच्या कामगिरीचे निरीक्षण आणि विश्लेषणासाठी त्या दिल्ली एनसीआर स्थित कारखान्यांमध्ये पाठवण्यात येतील.
वाहनांचा प्रमाणित साठा निर्माण करण्यासाठी, भारतीय हवाई दलाने इलेक्ट्रिक बसेस आणि इलेक्ट्रिक कार्सच्या सध्या सुरु असलेल्या खरेदीसाठी भारतीय सैन्याचे सहकार्य घेतले आहे. हे सक्रिय उपाय पर्यावरण -स्नेही गतिशीलतेच्या दिशेने परिवर्तन घडवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाप्रति भारतीय हवाई दलाची वचनबद्धता दर्शवतात.