कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमधील घसरण सोमवारी देखील सुरूच आहे. सध्या सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅम ५२ हजारांच्या खाली आला आहे. सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण पहायला मिळाली. आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणाने कमॉडिटी बाजारात नफावसुलीचे सत्र सुरू आहे. यामुळे आज सोमवारी सोने स्वस्त झाले. सोन्याचा भाव ५१७१५ रुपये प्रती दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीच्या दरात ४०१ रुपयांची घसरण झाली असून चांदीचा भाव एक किलोला ६६६६६ रुपये झाला आहे
आज बाजार उघडताच सोने पुन्हा दबावात आले. सोन्यामध्ये विक्री सुरु झाली. सध्या सोन्याचा भाव ५१६३० रुपयांपर्यंत घसरला होता. सध्या सोने ३०१ रुपयांनी स्वस्त झाले असून त्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ५१७१५ रुपये झाला आहे.
मागील आठवड्यात सोने १५०० रुपयांनी कमी झाले होते. तर चांदीचा भाव १६५० रुपयांनी कमी झाला होता. यापूर्वी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ५६१९१ रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकावर गेला होता. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १९४७ डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा भाव प्रती औंस २६ डॉलर आहे.