नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील 11 महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन व कोनशिला समारंभ उद्या होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या आभासी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राहाणार असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग (निवृत्त), उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, तसेच राज्यातील इतर मंत्री, खासदार, आमदार व केंद्र तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उद्या उद्घाटन होणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत बनवल्या जाणाऱ्या 363 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे बांधणी मूल्य रु. 4,281 कोटी आहे. या रस्त्यामुळे उत्तर प्रदेशातील दळणवळणाच्या दर्जात सुधारणा होईल, तसेच राज्याच्या आर्थिक विकासाचा मार्ग खुला होईल. या रस्त्यामुळे विशेषतः इतर राज्यांकडे दुतर्फा होणाऱ्या प्रवासी तसेच मालवाहतुकीत सुधारणा होईल. चांगल्या दर्जाच्या रस्त्यांमुळे वेळ व इंधन खर्चात बचत तर होईलच व वायुप्रदूषण पातळी देखील खाली येईल. शिवाय या प्रकल्पांमुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होऊन आसपासच्या शहरातली गर्दीही कमी होईल. एकूणच रस्ते वाहतुकीच्या दर्जात सुधारणा होईल.