नागपूर – वर्ध्यामधील हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीला एका नराधमाने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. सात दिवसांपासून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूशी असलेली झुंज अखेर संपली. आज सकाळी 6.55 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. त्यानंतर आज तिच्या मुळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कुटुंबीयांना आणि ग्रामस्थाना शोक अनावर.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणे झाल्यानंतर पीडितेच्या वडिलांचे समाधान झाले. तसेच त्यांनी मृतदेह स्वीकारला. यानंतर ते आपल्या गावाच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी फुलराणीच्या निधनाचे वृत्त समोर येताच कुटुंबियांनी नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात आक्रोष केला. एकही शासकीय अधिकारी येऊन भेटले नाहीत. फुलराणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली होती. वडिलांसह गावातील सरपंचांनी सुद्धा रुग्णालयात संताप व्यक्त केला. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मध्यस्थी केली. तसेच कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले.
फुलराणीच्या मृत्युनंतर दारोडा गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. फुलराणीचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या शववाहिकेला अडथळा निर्माण झाला होता. ग्रामस्थांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली.
आरोपीला देखील तशाच वेदना द्या, आई-वडिलांची मागणी
नागपूरच्या रुग्णालयात सकाळी 7 वाजेच्या सुमारास हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झुंज संपली. यानंतर तिच्या दारोडा गाव आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसह कुटुंबियांनी आक्रोष केला. आमच्या कुटुंबांची हानी झाली आहे. आम्ही काय वेदना सहन केल्या आमचे आम्हाला माहीत. आरोपीला सुद्धा तशाच वेदना द्या, त्याला पेट्रोल टाकून जाळा अशी भावनिक मागणी पीडितेच्या आई आणि वडिलांनी केली आहे.
वर्धासह हिंगणघाट परिसरात चोख पोलिस बंदोबस्त
हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूचे वृत्त समोर येताच वर्धासह तिच्या गावात आणि हिंगणघाट तालुक्यात ठीक-ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निधनाचे वृत्त ऐकून गावात शोककळा पसरली. त्यातच वर्धातील छोट्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्धार घेतला आहे. तर दुसरीकडे, नागरिकांनी संयमाने वागावे. आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेची तयारी केली आहे असे वर्धा जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले आहे.