अकोला – राज्य भर विविध उद्योग व खाजगी आस्थापनांवर काम करणाऱ्या कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्या, असे निर्देश राज्याचे कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.
राज्यातील विविध उद्योग व खाजगी आस्थापनांवरील कामगारांच्या किमान वेतन कायदा, आरोग्य विमा यासारख्या हक्काचे रक्षण झाले पाहिजे. त्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. जिल्ह्यात विटभट्टयांवरही अनेक कामगार हंगामी स्वरुपात काम करीता असतात. त्यांची नोंद करण्यात यावी. त्यांना रेशनकार्ड व शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवावी. विटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वस्तीशाळा सुरु करणे, इत्यादी उपाययोजनांचा अवलंब करावा. तसेच जिल्ह्यातील कामगारांना शासनाच्या वेगवेगळ्या घरकुल योजनांचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव तयार करा, असे निर्देशही श्री.कडू यांनी दिले.