उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपुर्द
मुंबई -‘कोरोना’च्या लढ्यासाठी वस्तू व सेवा कर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबईच्या वतीने 1 लाख 25 हजार रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. संस्थेचे प्रमुख कार्यवाह प्रमोद तावडे यांनी मंत्रालयात मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे काल सुपुर्द केला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत वस्तू व सेवा कर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबईच्या वतीने 1 लाख 25 हजार रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्यात आला आहे.