• देशातील सर्वात मोठे केअर सेंटर
• महापालिकेचे सुक्ष्म नियोजन प्रत्यक्ष अमलात
नागपूर, दि.13 : नागपूर महापालिकेने राधास्वामी सत्संग न्यास संस्थेच्या सहकार्याने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील आश्रमाच्या परिसरात सुमारे पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारले आहे. अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे व एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे देशातील पहिले ‘कोव्हिड केअर सेंटर’ ठरू शकते.
या सेंटरला आज पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली. विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यावेळी उपस्थित होते.
कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. नागपुरात सारे काही सध्या नियंत्रणात असले तरी भविष्यात उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे, यासाठी नागपूर महापालिकेने सूक्ष्मनियोजन करून हे ‘कोविड केअर सेंटर’ उभारले असल्याची माहिती आयुक्त मुंडे यांनी दिली.
सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे 42 विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. क्षमतेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ते आता अपुरे पडण्याची शक्यता आहे. भविष्यात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांची योग्य सोय अशा ठिकाणी व्हावी, त्यांच्यावर तेथेच उपचार करता यावे, यादृष्टीने मनपाने ‘कोव्हिड केअर सेंटर’ची संकल्पना मांडली. या संकल्पनेला राधास्वामी सत्संग न्यासने सहकार्य करीत उपचार कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली. केवळ जागाच उपलब्ध करून दिली नाही तर या सेंटरसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.
मॅटींग, बॅरिकेटींग, कम्पार्टमेंट, साईडिंग, डोम या सर्व व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे तर शुद्ध पिण्याचे पाणी आणि रुग्णांसाठी सात्विक भोजन आदी व्यवस्था सुद्धा संस्थेने केली आहे. डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी, बेड, चादर, उशी, भोजनासाठी ट्रे व अन्य काही व्यवस्था नागपूर महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. एकूणच केंद्र शासन आणि राज्य सरकारने ‘कोविड केअर सेंटर’बाबत ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच हे ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. या सेंटरला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. महापालिकेने अल्पावधित उभारलेल्या या व्यवस्थेबद्दल आयुक्त मुंडे यांची त्यांनी प्रशंसा केली.
‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये सद्यस्थितीत 500 बेड तयार करण्यात आले असून गरजेनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. येथे महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र बेड आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. प्रत्येक बेडला क्रमांक देण्यात आले असून तोच रुग्ण क्रमांक राहील. प्रत्येक 100 बेडच्या मागे 20 डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचाऱ्यांची टिम कार्यरत असणार आहे. डिस्टन्सिगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणीसह ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यांचे तापमान तपासणी, रक्त तपासणीही येथे केली जाणार आहे. याशिवाय रुग्णांचे येथे स्वॅब घेण्यात येईल. स्वॅबच्या अहवालानंतर रुग्ण जर पॉझिटिव्ह असेल आणि प्रकृती अतिगंभीर असेल तरच त्याची रवानगी रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डात करण्यात येईल. मात्र पॉझिटिव्ह असतानाही जर प्रकृती गंभीर नसेल, सहज उपचार शक्य असतील तर त्याला तेथेच अन्य कक्षात स्थलांतरित केले जाईल. रुग्णांसोबतच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इंसिडंट कमांडर व अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना या सेंटरची जबाबदारी देण्यात आली आहे.
0000