पुणे : चाकण, तळेगाव, शिरोळी व इंदुरी भागातील औद्योगिक ग्राहकांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी महावितरण पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज सोबत बैठक घेऊन ग्राहकांशी सुसंवाद साधला.
शुक्रवारी कोर्निंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, चाकण येथे झालेल्या बैठकीत चाकण, तळेगाव, शिरोळी व इंदुरी भागातील औद्योगिक ग्राहकांच्या वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी, उपकेंद्रातुन उद्भवणाऱ्या समस्या सोबतच वीज बिल व सुरक्षा अमानत रक्कम बिल याबाबत प्रादेशिक संचालक श्री नाळे यांनी अडचणी समजून घेतल्या व यावर ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची गय करणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विजेच्या पुरवठ्यात वारंवार येणार्या व्यत्ययामुळे नुकसान होत असल्याची तक्रार यावेळी ग्राहकांनी केली. त्यावर ताबडतोब उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. उपकेंद्रातील अडचणी व खंडित विजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. औद्योगिक ग्राहकांना विजेसंबंधी येत असलेल्या अडचणीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून लवकरच यावर फेरआढावा बैठक घेण्यात येणार आहे.
अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत करण्याबाबत व ताबडतोब उपाययोजना करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. वाढलेल्या इंधन अधिभाराचे बिलात होणारे समायोजन व सुरक्षा अनामत रक्कम बिलविषयी त्यांनी औद्योगिक ग्राहकांच्या शंकेचे निरसन केले. यावेळी महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता मनिष ठाकरे व इतर संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे पदाधिकारी श्री राकेश कुमार, श्री राजेश बटवाल, श्री विनोद जैन, श्री विनोद वर्मा, दिलीप बटवाल यांच्यासह चाकण एमआयडीसीतील हिताची अस्टेमो प्रा लि, कोरस इंडिया लिमिटेड, युनिव्हर्सल प्रोसेसिंग लिमिटेड, मिंडा इंडस्ट्रीज लिमिटेड, एल अँड टी डिफेन्स तळेगाव, बिल केअर शिरोळी, कॅडबरी कंपनी, इंदोरी व इतर जवळपास 60 औद्योगिक वीज ग्राहक प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते.