पुणे : राज्यातील कोविडबाधित रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस ( ब्लॅक फंगस) आजारावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या लिपोसोमल अम्फोटेरिसिन बी औषधांच्या किंमती आणि साठा यावर राज्य शासनाने ठोस उपाययोजना करून नियंत्रण ठेवावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज ( शुक्रवारी ) झालेल्या बैठकीत ब्लॅक फंगसवरील औषध दुप्पट किंमतीत किरकोळ बाजारात विकले जात आहे याकडे आमदार शिरोळे यांनी लक्ष वेधले आणि बऱ्याच वितरकांकडील साठा संपला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच या मागणीचे पत्रही उपमुख्य मंत्री पवार यांना दिले.
पत्रा मध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये औषधाची साठेबाजी, वाढत्या किंमती रोखल्या जाव्यात तआणि औषधांचा तुटवडा भासू नये याकरिता शासनाने खबरदारी घ्यावी, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
वैद्यकीय व्यावसायिक आणि इतर तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर शिरोळे यांनी राज्य सरकारला पुढील उपाय सुचविले आहे.
१) लिपोसोमल अॅेम्फोटेरिसिन बी ची विक्री (विविध ब्रँड नावाने) फक्त वितरकाद्वारेच केली पाहिजे आणि आवश्यकतेनुसार थेट रुग्णालयात पुरविली पाहिजेत.
२) सरकारने सध्याच्या साठ्यावर नजर ठेवली पाहिजे आणि संक्रमणाच्या संभाव्य वाढीपूर्वी उत्पादकांना उत्पादन वाढीची सूचना करावी.
३) औषध उत्पादक आणि ब्रॅण्डमध्ये किंमत निश्चित करावी.
४) बेकायदेशीर साठेबाजी आणि औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके आणि इतर कठोर उपाययोजना कराव्यात.