पुणे : कोथरूड परिसरातील करोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांची तातडीनं करोना चाचणी व्हावी या उद्देशाने महापालिकेकडून कोथरूड मधील अण्णासाहेब पाटील शाळेत रॅपिड अँटिजेन टेस्टचे सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात दिवसाला सुमारे 100 ते 125 चाचण्या करण्यात येत आहे.13 जुऐलेपासून ते कार्यान्वित झाले आहे.
महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या पुढाकारातून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या टेस्टचा निकाल अवघ्या अर्ध्या तासात येत असल्याने बाधित व्यक्तींना तातडीनं विलगीकरणात ठेऊन करोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड, सहायक महापालिका आयुक्त संदीप कदम , विभागीय आरोग्य अधिकारी डॉ संदीप मुळे, आरोग्य अधिकारी अंजली टिळेकर , विभागीय आरोग्य निरिक्षक राम सोनवणे हे यावेळी उपस्थित होते.
शहरात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोथरूड परिसरात मोठया प्रमाणात करोनाचे रूग्णवाढत आहेत, ही बाब लक्षात घेऊन या भागातील नागरिकांसाठी हे चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती, हे केंद्र सुरू झाल्याने नागरिकांची सोय झाली असून लवकरच या केंद्राची क्षमता आणखी वाढविण्यासाठी प्रशासनास सूचना करण्यात आल्याचे सुतार यांनी सांगितले. तसेच या केंद्रासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख, डॉ. अंजली साबणे तसेच डॉ. संजीव वावरे यांनी विशेष मदत केल्याचेही ते म्हणाले.