पर्यावरणप्रेमी ,नागरिक राजकारणी सारे एकवटले….म्हणाले, हे तर रामनदी च्या पूर रेषेत अतिक्रमण महापालिकेचेच …
पुणे- चांदणी चौकाकडून मुळशीला जाणाऱ्या पौड रस्त्यावर एकीकडे महापालिका प्रशासनाने ,कचरा डेपो, कचरा संकलन केंद्र ,कचरा हस्तांतरण केंद्र अशा तीन नावाने सोयीचा अर्थ काढीत कचरा डेपोचे काम सुरु केल्याने या परिसरातील नागरिकांत असलेले असंतोषाचे वातावरण आज रस्त्यावर पोहोचले भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत , माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील तसेच अल्पना वर्पे, किरण दगडे यांच्यासह या भागातील नागरिक, पर्यावरण प्रेमी यांनी आज कचरा प्रकल्पाचे काम सुरु आहे त्या समोरच प्रचंड मोठी मानवी साखळी करून भर उन्हात आपला तीव्र विरोध प्रगट केला . लोकशाही मार्गाने महापालिका प्रशासकाला जाग आली नाही तर त्याची जबाबदारी त्यांच्यावरच राहिल असाही इशारा यावेळी झालेल्या सभेतून देण्यात आला .
नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून , पुणे मनपाच्या मुख्य सभेत माहे डिसेंबर चा मान्य ठराव क्र.752 च्या अनुषंगाने स.नं. 64 , बावधन खुर्द येथील नियोजित कचरा हस्तांतरन केंद्र चा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून याठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्र प्रकल्प उभारण्याकरिता स्थानिक नागरिकांचा याबाबत तीव्र विरोध आहे. तरी सुद्धा याठिकाणी प्रशासक हे हटवादी भूमिका घेऊन कचरा हस्तांतरन केंद्र प्रकल्प उभारत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले या भागातील नागरिकाच्या हितासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही यश मिळे पर्यंत हे आंदोलन सुरु ठेऊ आता हे आंदोलन आम्ही कोणत्याही परिस्थितीत थांबविणार नाही .नगरसेवक दिलीप वेडेपाटील म्हणाले की,पुण्याची दुर्लक्षित 19.2 किमी लांबीची राम नदी पुनरुज्जीवित व्हावी, यासाठी सातत्याने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे, की जेथे नदीला आपण ‘माता’ म्हणतो. परंतु, दुर्दैवाने आपले आचरण नेमके विरुद्ध राहिले आहे. पुण्याचा विचार केला तर भावी पिढ्यांसाठी अविरल व निर्मल वाहणारी नदी म्हणून राम नदी असावी, हा आमचा ध्यास आहे आणि त्यासाठी कार्यरत राहण्याचा आमचा निर्धार आहे. भुकूम येथील रामेश्वर मंदिरापासून उगम पावणारी राम नदी भूगाव,बावधन, पाषाण, औंध मार्गे बाणेर येथे मुळा नदीला मिळते.
आमच्या ‘राम नदी पुनरुज्जीवन संकल्पा’स धक्का बसला, जेंव्हा 10 मार्च 2022 रोजी मौजे बावधन खुर्द येथील स.नं.६४ येथे रामनदी किनारी कचरा संकलन केंद्राचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. वास्तविक पाहता यापूर्वी प्रस्तुत प्रकल्प सस्थानिकांचा विरोध व मी नगरसेवक असताना सादर केलेल्या प्रस्तावामुळे 29 डिसेंबर 2021 रोजी रद्द करण्यात आला होता आणि तशी नोंद पुणे मनपाच्या ठरावात नमूद आहे. बावधन कचरा संकलन केंद्राचे काम थांबवावे, यासाठी आम्ही पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याशी पत्रव्यवहार केला; पण त्यास कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. कचरा संकलन केंद्राचा स.नं.६४ राम नदीच्या पूररेषेत येतो. असे असताना तेथे काम कसे होऊ शकते ? याच जागेत सुमारे ६०० फुटांचा नदी किनारा असल्यामुळे राम नदी प्रदूषित होणार. मध्यम प्रमाणात पाऊस झाल्यास या प्रकल्पात पाणी शिरणार आहे. यामुळे जमीनिखालून वाहणाऱ्या नदीचे आणि पर्यायाने काठावरील हजारो नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.
हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रशासनाचा का आग्रह आहे ? हे आम्हांस आजही कळत नाही. कोथरूड , वारजे, शिवणे इ. गावांमधून कचरा गोळा करायचा, तो सुमारे १०० वाहनांमधून येथे आणायचा आणि १०० वाहनांमधून तो कात्रज, कोंढवा इ. वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा, हा नियमित कर भरणाऱ्या आम्हा नागरिकांच्या पैशांचा अपव्यय आहे. या प्रकल्पाशेजारी डीपी रोड आहे आणि दुसऱ्या बाजूला कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. वाढत्या नागरिकीरणामुळे या रस्त्यावर आधीच वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. त्यात या २०० वाहनांची रोज ये – जा केल्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हे प्रकल्पीय ठिकाण हे पुणे शहराच्या पश्चिम भागात येते. पश्चिमेकडून पूर्व दिशेस वाहत असणाऱ्या वाऱ्याने संपूर्ण पुणे शहरात दुर्गंधी व रोगराई पसरून प्रादुर्भाव होवू शकतो. कचरा हस्तांतरण केंद्र प्रकल्प रद्द करण्याचा ठराव महापालिकेने मान्य केला असूनही जर याठिकाणी हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास या परिसरातील नागरिकांच्या रोषास पुणे महापालिकेला सामोरे जावे लागेल व या परिसरातील नागरिकांसह पुणे महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र जन-आंदोलन करण्यात येईल तसेच चांदणी चौकातून एकही पुणे मनपा ची कचरा गाडी या प्रकल्पाकडे येवू देणार नाही असा इशारा माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनास दिला.
या पूर्वी प्रस्तुत प्रकल्प, स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला होता -निकिता सणस
यावेळी बोलताना भूगावच्या सरपंच निकिता सणस म्हणाल्या की, ”दिनांक १० मार्च २०२२ रोजी मौजे बावधनखुर्द येथील सर्व्हे नं. ६४ येथे, राम नदी किनारी कचरा संकलन केंद्राचे काम पुन्हा सुरू करण्यात आले, हे दुर्दैवी आहे. वास्तविक पहाता या पूर्वी प्रस्तुत प्रकल्प, स्थानिकांच्या विरोधामुळे २९ डिसेंबर २०११ रोजी रद्द करण्यात आला होता आणि तशी नोंद पुपो म.न.पा.च्या ठरावात नमूद आहे.
”राम नदी प्रदुषित होणार – वीरेंद्र चित्राव
तसेच किर्लोस्कर वसुंधरा, रामनदी रीस्टोरेशनचे वीरेंद्र चित्राव म्हणाले की, ”प्रस्तुत कचरा संकलन केंद्र राम नदीच्या पूररेषेत येते. याच जागेत सुमारे ६०० फूटाचा नदी किनारा असल्यामुळे राम नदी प्रदुषित होणार आहे.
”नियमित कर भरणाऱ्या आम्हा नागरिकांच्या पैशाचा अपव्यय – सुवर्ण आंग्रे
भुकूमच्या सरपंच सुवर्णा आंग्रे म्हणाल्या की, ”वारजे, शिवणे इ. गावांमधून कचरा गोळा करायचा, तो सुमारे १०० वाहनांमधून येथे आणायचा आणि पुन्हा १०० वाहनांमधून तो कात्रज, कोंढवा इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊनजायचा, हा नियमित कर भरणाऱ्या आम्हा नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आहे‘
बावधन कचरा डेपो हटाव’ मानवी साखळीस या संस्थांनी दर्शवला पाठिंबा
–‘बावधन कचरा डेपो हटाव’ मानवी साखळीस किर्लोस्कर वसुंधरा रामनदी पूनरुजीवन, एकोलोजिकल सोसायटी, जीवितनदी, जलबिरादरी, वसुंधरा स्वच्छ्ता अभियान, मिशन ग्राउंड वॉटर, जलदेवता सेवा अभियान, पराडकर फाउंडेशन, सागर मित्र, उदय काळ फाउंडेशन, सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान, सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, एकोलोजी फाउंडेशन, सह्याद्री फाउंडेशन, लायन्स डिस्ट्रिक्ट 3234, लायन्स क्लब पुणे इको फ्रेंड, उमा फाउंडेशन, कम्युनिटी डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर आणि धार फाउंडेशन या संस्थांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.