उद्धव ठाकरे विश्वास ठेवावा असे नाहीत म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी घेतलेली एकनाथ शिंदे यांची भेट अराजकीय असेल ?
मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नूतन निवासस्थान शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. राज ठाकरेंच्या घरातील दीड दिवसांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी व राज ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी हजेरी लावली होती. राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील ही पहिलीच भेट होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत माहिम-दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकरही उपस्थित होते.आमची राजकीय चर्चा झाली नाही ही भेट राजकीय नव्हती.” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गणेशाचे आगमन झाले. त्यानंतर आनंदाचे वातावरण आहे. याचनिमित्ताने मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्याकडे मी गेलो. तेथे गणपतीचे दर्शनही घेतले. बाकी काहीच नाही. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. मागे त्यांची शस्त्रक्रिया घेतली. त्यानंतर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. शस्त्रक्रियेनंतर तेव्हाच भेट घेणार होतो पण जमले नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्यात राजकीय चर्चा काहीच झाली नाही, त्यामुळे राजकीय नांदी आणि राजकीय समीकरण जुळवले असे म्हणता येणार नाही. दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होते त्यामुळे त्यांना भेटलो.मुख्यमंत्री म्हणाले, चर्चेत आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला. राज ठाकरे आणि मी बाळासाहेबांसोबत काम केले आहे. मी महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री आहे हे पोस्टर जरी असले तरी शेवटी हे जनता ठरवत असते. कमी वेळात आम्ही मोठे निर्णय घेण्याचे धाडस केले आहे. राजकीय चर्चा माझी आणि राज ठाकरे यांची झाली नाही हे मी स्पष्ट करतो असेही त्यांनी सांगितले.