कोरोना नियंत्रणात राज्य शासन गंभीर नाही महापालिकेला केवळ ३ कोटी रुपयांचा निधी
महाविकास आघाडीचे आकसाने राजकारण भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका
पुणे, : पुणे शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून तब्बल २०० कोटी रुपयांचा खर्च होत असताना, राज्य शासन याबाबत गंभीर नसून, महापालिकेला केवळ ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडी आकसाने राजकारण करत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण, वैद्यकीय चाचण्या, स्वॅब तपासण्या, अटिंजेन किटचा वापर, कोव्हिड सेंटरची निर्मिती, क्वारंटार्इन सेंटरवरील सुविधा, रुग्णालयांतील सुविधा, व्हेंटिलेटर, पीपीर्इ किट, शिधावाटप आणि जनजागृती अशी कोरोना नियंत्रणासाठी लागणारा खर्च महापालिका करीत आहेत. तसेच दहा खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठीचा खर्चही महापालिकेला करावा लागत आहे.
या सर्व कामांसाठी महापालिकेने आतापर्यंत सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तर राज्य शासनाने केवळ ३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महापा लिकेचा आजपर्यंत झालेला खर्च, कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयाची निर्मिती, महापालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या सुविधा निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, पुढील काळात कोरोनावर नियंत्रण आणणे आदी कामांसाठी राज्य शासनाने ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी मुळीक यांनी केली आहे.
मुळीक म्हणाले, ‘राज्य शासनाने निधीचे वितरण करताना महापालिकेच्या वर्गवारीचा निकष न लावता उपचार घेणार्या रुग्णांच्या संख्येचा विचार करावा. पुणे शहरात आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ३४ हजार ४० इतकी असून, २१ हजार १०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार १६ इतकी आहे.’