रायगड दि. २३ ऑगस्ट – राज्य सरकार हिंदू सणाच्या विरोधात आहे. कोरोनाचे गांभीर्य सर्वांना आहे, परंतु लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदाना दहिहंडीकरता परवानगी द्यावी, अशी मागणी विधान परिषद विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
दरेकर म्हणाले की, सण-उत्सवाची परंपरा कायम राखत कोरोनाच्या परिस्थितीची खबरदारी व काळजी घेत हा सण साजरा झाला पाहिजे. लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहिहंडीला शासनाने परवानगी द्यावी. असे झाले नाही तर हे सरकार हिंदू सणाच्या विरोधात आहे असा संशय बळावत जाईल, अशी टिका दरेकर यांनी केली.
राज्यात मंदिरे उघडण्याची मागणी सातत्याने जनतेकडून होत असून महाराष्ट्रतील देवदैवत कुलुपात आहेत. त्यामुळे मंदिराबाहेर असणारे छोटे व्यवसाय बंद असून त्यावर उपासमारीची वेळ आली आहे. धार्मिक स्थळे सर्वसामान्यांसाठी का उघडली जात नाहीत? असा सवाल करत दरेकर म्हणाले की, आधी मंदिरे बंद आता आमच्या सणावरदेखील बंदी का? सरकारला सत्तेच्या लालसेपोटी हिंदू सणांचा विसर पडला असल्याची टीका दरेकर यांनी केली.