रेमेडीसीवर प्रकरणात दमनच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर सोडले
मुंबई -पोलिसांनी दमन येथील एका फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.आणि तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत जाब विचारला.
रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरण कमालीचे तापले असून रात्री उशिरा राज्यात मोठे राजकारण घडते आहे. दमनच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर माध्यमांना सांगितले की, महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे.
एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी १० पोलिस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. आज पोलिस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला.
महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही, एवढेच म्हणेन.